मुंबई, दि. 31 : जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामधील विद्यार्थी विनिमय कराराचे नुतनीकरण झाल्याने जपान आणि भारताचे नाते अधिकच दृढ झाले आहे. यामुळे उभय देशातील विद्यार्थ्यांमध्ये नागरी, सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाण - घेवाण होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होईल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे सांगितले.
वाकायामाचे राज्यपाल योशीनोबू निसाका आणि जपानचे उद्योग आणि पर्यटन व्यापार शिष्टमंडळासमवेत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जपान आणि भारत यांच्यामधील व्यापार आणि पर्यटन अधिक दृढ होण्याच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांच्यासह जपानच्या शिष्टमंडळातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री. श्री रावल म्हणाले, जपानच्या संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात बुद्धीझ्मचा प्रभाव आहे. हा भारत आणि जपान यांना जोडणारा दुवा आहे. विद्यार्थी विनिमय कार्यक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यापर्यंत राबविला जाणार आहे. दोन्ही देशाच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि जपानमध्ये हा करार करण्यात आला आहे. त्यानुसार आपल्याकडील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वाकायामाला प्रतिनिधींसमवेत जाऊ शकतील आणि वाकायामाचे विद्यार्थी महाराष्ट्रात येऊ शकतील.
'महाराष्ट्र ३६० - डिग्री' हे अभियान पर्यटन विकासासाठी या वर्षी राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे पर्यटनस्थळे आणि त्यातील विविधता जगभर पोहोचविण्यासाठी शासन काम करीत आहे. समुद्रपर्यटनासाठी आशियाई देशांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मीनलद्वारे इतर देशांशी संबंध अधिक दृढ होणार आहेत. या टर्मीनलमध्ये विविध देशांतील ९५० जहाजे येऊ शकतील जेणेकरून राज्याच्या पर्यटनात वाढ होण्यास मदत होणार आहे,असे ही मंत्री महोदयांनी सांगितले.
वाकायामाचे राज्यपाल योशीनोबू निसाका म्हणाले, आधुनिक बुद्धीस्ट चळवळीचे प्रणेते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोयासान विद्यापीठातील पुतळा भारत आणि जपान यांच्या मैत्री स्थापन करण्याचे कारण होऊ शकली आहे. सांस्कृतिक कराराद्वारे दोन्ही देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे भारत आणि जपान या उभय देशांतील बंध अधिक दृढ झाले आहेत. आदान - प्रदान, पर्यटनातील अर्थव्यवस्था, कृषी आणि स्थानिक उद्योग अशा विविध क्षेत्रात एकत्रितरित्या काम करण्यासाठी करार झाले असून या कराराच्या नुतनीकरणामुळे उभय देशांतील संबंध आणखीनच दृढ होण्यास मदत होणार आहे. उभय देशातील करारामुळे दोन्ही देशातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात नागरी आणि शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रातील ज्ञानात भर पडेल.
००००
No comments:
Post a Comment