मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र दारिद्र्य निर्मुलनासह शाश्वत विकासाच्या कामात देशाचेच नाही तर पूर्ण आशियाचे नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करून संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नियोजन विभागात दारिद्र्य निर्मुलनासाठी सुरु केलेल्या“ॲक्शन रुम” च्या महत्वाकांक्षी पावलाचे कौतुक केले.
ॲक्शन रुमच्या उदघाटनानंतर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या १३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, यांच्यासह टाटा ट्रस्ट, सेंट्रल फुड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, आय.आय.टी मुंबईचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. युरी म्हणाले, भारताने शाश्वत विकासाची ध्येय निश्चित करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली असून जागतिक प्राधान्यक्रमात भारताची ही भूमिका यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारे एकूण विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देत आहेत. दारिद्र्य निर्मुलनासाठी ॲक्शन रुमची स्थापना करून महाराष्ट्र शासनाने या कामात आपले महत्वाकांक्षी पाऊल पुढे टाकले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाचे १७ संकल्प, १६९ उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत. त्याचा भारतासह जगातील १९३ देशांनी स्वीकार केला आहे. एकात्मिक विकासाबरोबर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात शाश्वत विकासाची समन्वयक दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन काम करताना दारिद्र्य निर्मूलन,शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, पर्यावरणीय बदल आदी मुख्य विषयांची सर्व उद्दिष्टये २०३० पर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही श्री. युरी यांनी यावेळी सांगितले.
समाजाला विकास संधींची गरज- सुधीर मुनगंटीवार
समाजाला विकास संधीची गरज असते. त्या संधींचा विस्तार करतांना या ॲक्शन रुमच्या माध्यमातून २७ तालुक्यांमध्ये एक “रोजगार आंदोलन” निर्माण केले जाईल असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरणाचे ज्यांनी रक्षण केले ते विकासात मागे राहिले आणि ज्यांनी पर्यावरणाचे शोषण केले ते विकासात पुढे गेले, यातून गरजेसाठी संघर्ष करणारा आणि हव्यासासाठी शोषण करणारा वर्ग निर्माण झाला. विकासाच्या या दऱ्या सांधल्या नाहीत तर भविष्यात रोजगारासह अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी राहणार आहेत. त्यामुळे वेळीच पाऊल उचलून विकासाच्या या दऱ्या सांधण्याचे काम या ॲक्शन रुम मार्फत हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात २७ नक्षत्र असतात. २७ तालुक्यांचा विकास करून राज्यात २७ तालुका नक्षत्र तयार होतील असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघाच्या श्री. युरी यांनी १९३ देशांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या या कामाचा आवर्जुन गौरव करावा इतके उत्तम काम सर्व संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करून दाखवावे, योजना यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ॲक्शन रुमची संकल्पना अतिशय सकारात्मक- पंकजा मुंडे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी ॲक्शन रुमची स्थापना करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणल्याबद्दल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वित्तमंत्र्यांचे अभिनंदन करून पुढे म्हटले, ही संकल्पनाच खूप सकारात्मक आहे. यात शासनाच्या सर्व विभागांबरोबर खासगी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग ही तितकाच महत्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने या दिशेने महत्वाकांक्षी पाऊले टाकल्याचेही त्यांनी अनेक उदाहरणातून सांगितले. कृषी विकासासाठी पाणी लागते हे विचारात घेऊन जलयुक्त शिवार सारखी योजना, कृषी मालाची ने- आण करण्यासाठी चांगले रस्ते गरजेचे असतात हे विचारात घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसारखी योजना शासनाने अंमलात आणल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बचतगटांची निर्मिती करून त्यांना शून्य टक्के व्याज दराने वित्त पुरवठा करणारी सुमतीबाई सुकळीकर योजना शासनाने राबविल्याचेही त्यांनी सांगितले. रोजगार निर्मितीबरोबर या क्षेत्रात जीवनोन्नतीसाठी पूरक ठरणाऱ्या सर्व बाबींचा, पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांचा समावेश आहे. दारिद्र्याचे स्वरूप आणि व्याख्या शहर, ग्रामीण भागात वेगवेगळी असू शकते, लिंग भेदाचा ही त्यात विचार करावा लागतो असे सांगून त्यांनी या संपूर्ण प्रवासात“स्वय सक्षम” करण्याच्या प्रक्रियेला अधिक महत्व असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीत टाटा ट्रस्ट, सेंट्रल फुड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्युट, आय.आय.टी. मुंबई यांनी त्यांच्यामार्फल लाईव्हलीहूड क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देणारे सादरीकरण केले.
००००
No comments:
Post a Comment