*सर्वांसाठी घरकूल योजनेची अंमलबजावणीला प्राधान्य
नागपूर, दि. 1 : ग्रामीण तसेच शहरी भागातील ज्यांच्याकडे स्वत:चे घरकुल नाही अशा कुटुंबांसाठी 10 हजार घरांचे नियोजन करण्यात आले असून यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा तात्काळ घेऊन घरकुल योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरु करा, अशा सुचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सिव्हिल लाईन्स रविभवन येथे बैठकीत दिल्या.
बैठकीत आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डी . मल्लिकार्जुन रेड्डी, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मौजा भिलगांव येथील ख. नं. 111 या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेल्या नोटीस, भावसार समाजास मौजा हुडकेश्वर येथील सांस्कृतिक सभागृह बांधण्याकरिता देण्यात आलेली जमीन व त्या संबंधी वाद, मौजा तरोडी (खुर्द), बिडगांव, वाठोडा, भांडेवाडी येथील 262 भुखंड धारकांचे पूनर्वसन, प्रभाग क्र. 11, बाबा बगदादीया नगर, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड नागपूर येथील विविध विकास कामाकरिता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देणे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत 29 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासंबंधिचा वाद, तसेच पारशिवनी खरेदी विक्री संघास शासकीय तूर खरेदीची परवानगी देणे आदि विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीत परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पालकमंत्री समोर आपल्या समस्या मांडल्या. पालकमंत्री यांनी संबंधित विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. काही भागात अतिक्रमण तसेच अन्य कारणाने घरकूलापासून वंचितांचे पुनर्वसन करीत त्यांना नियमानुसार घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच आवश्यक त्या विषयांमध्ये शासन व कोर्टाचे मार्गदर्शन मागण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment