Tuesday, 27 February 2018

मराठी विद्यापीठाचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवून मंजूरीसाठी पाठपुरावा करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई, दि. 27:राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मराठी भाषा विद्यापीठासाठी वांद्रे येथील जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथाली प्रकाशन तथा वाचक चळवळीचे संस्थापक दिनकर गांगण यांच्याकडे सुपूर्त केली.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मराठी अभिजात आहेच मात्र तिच्यावर राजमुद्रा उमटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ग्रंथालीने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम पार पडत असल्याचा आनंद आहे.
            ते पुढे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध आहे. तथापि, पुढील पिढीला मराठीचे महत्व समजावे यासाठी ग्रंथाली आणि अशा अन्य चळवळींचे योगदान महत्वाचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातील कक्षा रुंदावणारी चळवळ असलेली ग्रंथाली चळवळ पुन्हा रुजण्यासाठी शासनाने मदतीची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.
            विधानभवनातील समिती कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमात यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार नरेंद्र पवार, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ग्रंथालीचे कार्यकारी विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर, संपादक आणि विश्वस्त पद्मभूषण देशपांडे, संपादक अरुण जोशी, धनश्री धारव, लतिका भानुशाली, डिजिटल आवृत्तीचे संपादक धनंजय गांगण, साहित्यिक महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment