Tuesday, 27 February 2018

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार कुटूंबांना ऑक्टोबरपर्यंत दोन हजार घरे देणार - नितीन गडकरी



                              *शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा
      *50 हजार घरे बांधण्याचे नियोजन     
                              *घर वाटपाची पध्दत निश्चित करा
*नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, शहर पाणीपुरवठा आदी प्रकल्पांचा आढावा
             
नागपूर, दि. 27 :  हक्काचा निवारा नसलेल्या कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 50 हजार घरकुल बांधण्यात येणार असून पहिल्या टप्यात सुरू झालेल्या दहा हजार घरकुल बांधकामापैकी येत्या ऑक्टोबरपर्यंत दोन हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप करण्यात येईल, अशी माहिती केंद्रिय भूपृष्ठ  वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
            नागपूर शहर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकप्रतिनिधी,  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, समिर मेघे, मल्लीकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मेट्रोचे ब्रिजेश दिक्षीत, महानगर आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ब्रिजेश कुमार गुप्ता, माजी महापौर प्रविण दटके, नेता संदिप जोशी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश सुर्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. चंद्रशेखर  तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            हक्काचे घरकुल नसलेल्या कुटूंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शहरात व सभोवताल 50 हजार घरकुलांच्या बांधकामाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 10 हजार घरकुलांच्या बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. घरकुलाच्या बांधकामासाठी येणाऱ्या सर्व अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगतांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, वाठोडा तरोडी येथील घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्यात असून इतरही प्रकल्पातील घरे अवैधपणे झोपडपट्टीत राहणारे कुटूंब, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होणारे कुटूंब आदीना प्राधान्याने घरकुलांचे वाटप पूर्ण करावे
            नागपूर महानगर पालिकेने एसआरए अंतर्गत बांधलेल्या घरकुला साठी रस्ता, पाणी, वीज आदी  सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही घरेसुध्दा येत्या ऑक्टोबर पूर्वी  वाटपाचे नियोजन करावे.  अशी सूचना करतांना श्री. नितीन गडकरी म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधतांना रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात.
            घरकुल वाटपासाठी महानगर पालिकेतर्फे शहरातील बेघर कुटूंबांकडून मागणी नोंदविण्यात आली होती.  त्यानुसार या योजनेत पात्र ठरणाऱ्यांना घराच्या वाटपासंदर्भात पध्दत निश्चित करावी, अशी सूचना करतांना ते पुढे म्हणाले की, घरकुल प्रकल्प राबवित असतांना शहराच्या सौदर्यात भर पडेल व प्रत्येक बेघर त्याच्या आर्थिक निकषानुसार उपलब्ध होईल.  यासाठी  शासन व खाजगी विकासक यांच्या पीपीपी तत्वावर घरकुल बांधकामाला प्रोत्साहन द्यावे अशी सुचनाही यावेळी केली.
            नागपूर मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या अंबाझरी येथील जागेच्या प्रश्नासंदर्भात स्टेशन साठी जागा नागपूर सुधार प्रन्यासने हस्तांतरित करावी, ईतवारी भागातील किराणा मर्चंन्ट , होलसेल ग्रेन व ईतर बाजारपेठ अत्यंत सुसज्ज जागेत स्थानांतरित करावे यासाठी व्यावसायिकांना सर्व सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी 14 एकर जागेवर विकास आराखडा एक महिन्यात सादर करावा.  ड्रॅगन पॅलेससाठी महामार्गावरून रस्ता उपलब्ध करून देणे, रामटेक ते वर्धा, कळमेश्वर आदी रेल्वे मार्गावर मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देणे, फ्लाय ॲशचा वापर वाढवून विट तयार करण्यासोबत सिमेंट रस्त्याचा वापर, वेस्टर्न कोल्ड फिल्ड मधून नागपूर  येथील प्रकल्पांना रेती उपलब्ध करून देणे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत झिरो माईल ते ऑटोमोटीव्ह चौक रस्ता, पारडी उड्डाण पूल, कोराडी व कन्हान उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
            नागपूर शहर पाणी पुरवठा तसेच पेंच प्रकल्पामधून पाण्याची उपलब्धता व ईतर पर्यायी व्यवस्था याबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
नागपूर स्मार्ट सिटी बाबतचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
            यावेळी विविध विकास प्रकल्पांच्या अडचणी संदर्भात माहिती घेवून त्या तात्काळ सोडविण्यात येतील असेही केंद्रिय मंत्री नितीन  गडकरी यांनी सांगितले
            लोकप्रतिनिधींनी विकास प्रकल्पाची अंमलबजावणी संदर्भात यावेळी सूचना केल्यात.
*****


No comments:

Post a Comment