नवी दिल्ली, २७ : मराठी रंगभूमीवरील अभिनय, लेखन व दिग्दर्शनाच्या माध्यमातून आपण मराठी भाषेची सेवा करीत आहोत, याचा सार्थ अभिमान असल्याच्या भावना कलावंत व ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
मराठी भाषा दिनानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्रात आज प्राजक्त देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत मांडले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. देशमुख यांचे तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले. यावेळी मुक्तपत्रकार निवेदिता मदाने वैशंपायन यांनी श्री देशमुख यांची प्रकट मुलाखत घेतली.
श्री. देशमुख म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांनी समाज मन घडवले. विविध लोककला, साहित्य , नाटक यांनी ही पंरपरा सक्षमपणे पुढे नेली. त्यामुळे मराठी माणूस हा ख-या अर्थाने कलाप्रेमी असल्याचा अनुभव आपणास येतो. मराठी माणसांच्या कला प्रेमामुळे मराठी भाषा समृध्द होत गेली आहे असे त्यांनी सांगितले.
श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यांच्या जन्मभूमीत श्री देशमुख यांची झालेली जडणघडण याविषयी
माहिती दिली. बालपणापासून सुरु झालेला अभिनयाचा प्रवास सुमेत थिएटर सोबतची नाटके. आता समविचारी मित्रांच्या संकल्पनेतून साकार झालेला अश्वमेध थिएटर ग्रुप व लेखक व दिग्दर्शकाच्या भूमिकेत नुकतेच दिल्लीतील राष्ट्रीय नाटय शाळेच्या वतीने आयोजित ८ व्या थियेटर ऑल्म्पीकमधील सहभाग याविषयी त्यांनी विविध अनुभव सांगितले. राजधानीत मराठी नाटक करताना महाराष्ट्रा प्रमाणेच प्रेक्षकांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद याचाही उल्लेखही त्यांनी यावेळी केला.‘संगीत देव बाभळी’ नाटकाचे लेखन व दिग्दर्शनाची निर्मिती प्रक्रिया व यापुढे चित्रपटाच्या माध्यमातून करावयाचे कार्य यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषेच्या विकासाचे विविध टप्पे उलगडून दाखविले आणि मराठी भाषा दिन साजरा करण्यामागील भूमिका मांडली. उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment