Monday, 2 April 2018

भारत राखीव बटालियन आणि राज्य राखीव पोलीस बल निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 2 : अकोला-चंद्रपूर येथे भारत राखीव बटालियन तर नगर येथे राज्य  राखीव पोलीस बल निर्मितीबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करावा व त्यास मान्यता घ्यावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
आज मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एसआरपी) संदीप बिष्णोई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद, गोंदिया, कोल्हापूर येथे भारत राखीव बटालियन कार्यान्वित आहेत. या बटालियनसाठी केंद्र शासनाकडून निधी पुरवण्यात येतो. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन उभारण्यास आणि प्रत्येकी १००७ पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मौजे मनात्री बगु, तळेगाव वडनेर, तालुका तेल्हारा, ‍जि. अकोला येथे एक व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पोंभूर्णा- चंद्रपूर येथे एक भारत राखीव बटालियन अशा दोन नवीन बटालियन उभारणीचा तसेच मौजे कुसडगाव, ता. जामखेड जिल्हा अहमदनगर येथे राज्य राखीव पोलीस दल उभारणीचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
चंद्रपूर येथे उभारावयाच्या भारत राखीव बटालियनसाठी जागा निश्चिती बाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी गृह विभागाशी समन्वय साधून ती निश्चित करावी असेही ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर जिल्हाधिकारी आशुतोष सलिल हे व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
००००

No comments:

Post a Comment