नवी
दिल्ली, दि. 27 : सिंधुदुर्ग
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट सुविधेत वाढ होणार असून या जिल्ह्यात
लवकरच 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय
दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केंद्रीय वाणिज्य, व्यापार व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे दिली आहे.
सिंधुदुर्ग
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व ब्रॉडबॅंड नेटवर्कचे जाळे विस्तारण्याच्या
योजनेअंतर्गत टू-जी क्षमतेचे 74 व थ्री-जी क्षमतेचे 110 मोबाईल टॉवर नजिकच्या
काळात उभारण्याच्या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात आली.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात मोबाईल व ब्रॉडबॅंड सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी राष्ट्रीय ऑप्टीकल
फायबर नेटवर्कचे जाळे व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत श्री. सिन्हा
यांना श्री प्रभू यांनी पत्र लिहीले होते.
सध्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 188 टू-जी व 68 थ्री-जी मोबाईल टॉवर्स
आहेत. मात्र, या भागातील रम्य समुद्रकिनारे व
इतर परिसरातही पर्यटकांची गर्दी कायम असते. त्यामुळे या जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण
भागात मोबाईल सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याची गरज केंद्रीय मंत्री श्री.
प्रभू यांनी पत्राद्वारे व्यक्त केली होती. श्री. सिन्हा यांनी आपल्या पत्रोत्तरात
मोबाईल टॉवर्सची संख्या आणखी 184 ने वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे कळविले
आहे.
त्याचबरोबर
रत्नागिरी जिल्ह्यातील 365 ग्राममंचायतींमध्येही आधुनिक ब्रॉडबॅंड सुविधा
पुरविण्यात येईल, अशीही माहिती सिन्हा
यांनी पत्राव्दारे कळविली आहे.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील 368 ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबॅंडद्वारे जोडणी करण्यात येणार आहे.
यामुळे या जिल्ह्यातील दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री श्री. प्रभू यांना लिहीलेल्या पत्रात केंद्रीय
दूरसंचारमंत्री सिन्हा यांनी ही माहिती दिली.
००००
No comments:
Post a Comment