महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच
वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन
समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला
येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून मदत केली जाणार आहे.
पर्यावरणाचे
संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर
वृक्ष लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी
शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही
साधले जावे यासाठी वन विभागातर्फे एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून 10 रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. त्यात ५ रोपे
सागाची,
२ रोपे आंब्याची आणि फणस, जांभुळ व चिंचेच्या प्रत्येकी एका रोपाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत
जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. फळबाग लागवड योजनेतून या लाभार्थ्यांना मदत
करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि
सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण
मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणून
वृक्षाच्छादन वाढविणे हाही या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १
एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे
अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील.
लाभार्थींनी त्यांची लागवड दिनांक १ जुलै ते ७ जुलै
या कालावधीत करावयाची आहे. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य
घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी
कुटुंबांना होईल असा अंदाज आहे.
-----०-----
No comments:
Post a Comment