Wednesday, 27 June 2018

मंत्रिमंडळ निर्णय : अक्कलकोट नगर परिषदेस यात्राकरापोटी अनुदान


            अक्कलकोट (जि. सोलापूर) या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या यात्रेकरुंना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे शक्य व्हावे, यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेस 2018-2019 पासून यात्राकर अनुदान लागू करण्यास व त्यापोटी दरवर्षी 2 कोटी रुपये वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            राज्यात नगरपरिषदांच्या क्षेत्रात यात्रास्थळे आहेत. या तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या यात्रेकरुंकडून संबंधित नगरपरिषदा यात्राकर वसूल करीत होत्या. राज्यातील त्र्यंबकेश्वर, आळंदी, जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर व रामटेक या सहा नगरपरिषदांच्या क्षेत्रात 1977-1978 पासून यात्राकर बंद करुन त्यापोटी त्यांना शासनाकडून यात्राकर अनुदान देण्यात येते. तर पैठण नगर परिषदेस 2007 पासून यात्राकर अनुदान लागू करण्यात आले आहे. यात्रेकरुंना मूलभूत सुविधा पुरविताना संबंधित नगरपरिषदांवर येणारा आर्थिक ताण कमी होण्यास यात्राकर अनुदानामुळे मदत होते.
            याच धर्तीवर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या यात्रेकरुंना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 2018-2019 पासून यात्राकर अनुदान लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची संख्या, क्षेत्रफळ, स्थानिक मागणी तसेच क्षेत्रीय अहवाल या सर्व बाबी विचारात घेऊन प्रतिवर्षी अक्कलकोट नगर परिषदेस दोन कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
-----0-----

No comments:

Post a Comment