मुंबई, दि.1 :गतवर्षीचे सोयाबीन अनुदान तात्काळ
वितरीत करण्यासाठी खासगी बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन
द्यावी. कोणताही सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश सहकार व
पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यातील खासगी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित
अनुदानाबाबत श्री. देशमुख यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. बैठकीस आमदार राजेंद्र पटणी, आमदार तानाजी
मुटकुळे, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, पणन उपसंचालक ज्योती शंखपाल यांच्यासह
हिंगोली व वाशीम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पणनमंत्र्यांना माहिती
देण्यात आली की, गतवर्षी पणन विभागाच्या अखत्यारितच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत
खरेदी केलेल्या सोयाबीनचे अनुदान शासनाने वितरीत केले होते. या बाजार समित्यांनी
शेतकऱ्यांची आवश्यक माहिती ऑनलाईनपद्धतीने भरल्यामुळे अनुदान वितरीत करण्यात आले.
मात्र खासगी बाजार समित्यांनी ही माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली नसल्यामुळे अनुदान
वितरीत करता आले नाही.
खासगी बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची
माहिती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. पणन संचालकांनी प्राप्त होणारी माहिती
शासनाकडे पाठविल्यानंतर तात्काळ त्या अनुषंगाने आवश्यक अनुदानाबाबत मंत्रिमंडळ
उपसमिती किंवा आवश्यकता पडल्यास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवून शेतकऱ्यांना
लवकरात लवकर अनुदान मिळेल यादृष्टीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही पणनमंत्री श्री. देशमुख
यांनी यावेळी दिली.
*****
No comments:
Post a Comment