Wednesday, 1 August 2018

राज्यातील आरोग्य सुविधांचे मॅपिंग करावे - आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश




स्थानिकस्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा वाढवाव्यात
मुंबई, दि. 1: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपींग सल्लागार संस्थेमार्फत करण्यात यावे. जेणेकरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकेल, असे निर्देश देतानाच शासकीय रुग्णालयांमध्ये येत्या काही काळात औषधांची कमतरता भासू नये म्हणून स्थानिकस्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घेतला.
मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री विजय देशमुख, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन आदी उपस्थित होते.
राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये औषधांची कमतरता काही वेळेस जाणवते. विशेषता ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्रामध्ये पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता भासू नये यासाठी आपत्कालिन परिस्थितीत स्थानिकस्तरावर औषध खरेदीचे अधिकार वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आकस्मिक औषध खरेदीसाठी 5 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादा आहेत त्या वाढवून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
शासनाच्या विविध विभागांना लागणारी औषधे हाफकीन महामंडळामार्फत खरेदी करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार या महामंडळाचे सक्षमीकरण करून त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देतांनाच खरेदीची प्रक्रिया गतिमान करावी. ई-निविदेचा कालावधी कमी करतानाच औषध खरेदी करताना खरेदी धोरणात आवश्यक तो बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपिंग करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून त्यामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेत सहभागासाठी राज्यात 15 ऑगस्टपूर्वी सामंजस्य करार करण्यात यावा आणि राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना परिमाणकारक पद्धतीने राबवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीस मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय देशमुख, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment