पुणे, दि. 7 : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी
इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून राजे
उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करणार असल्याची महत्वपूर्ण
घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
भिवडी ता. पुरंदर येथील हुतात्मा उमाजी नाईक
विद्यालयाच्या प्रांगणात जय मल्हार क्रांती संघटना व भिवडी ग्रामस्थ यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२७ व्या जयंती महोत्सवात
मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी अन्न, औषध, संसदीय
कामकाज तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारण
मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक
न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार बाळा
भेगडे,
माजी
मंत्री दादासाहेब जाधवराव, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे वंशज रमण
खोमणे-नाईक, चंद्रकांत खोमणे-नाईक, भिवडीच्या
सरपंच उषा मोकाशी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रामोशी
समाजाला मोठा इतिहास आहे. राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून
सोडले. ब्रिटीश सरकार विरोधात त्यांनी पहिले बंड पुकारले. या राजाने स्वातंत्र्य
युध्दाची सुरूवात केली. त्यांचे हे कर्तृत्व पाहून इंग्रजांनी जाणूनबुजून त्यांचे
नाव दरोडेखोरांच्या यादीत टाकले. बहिर्जी नाईक ते उमाजी नाईक अशा उज्ज्वल
इतिहासाची समाजाला परंपरा आहे. इंग्रजांनी चुकीचा इतिहास लिहिल्यामुळे हा समाज
शिक्षण, संस्कृती यापासून वंचित राहीला. देशासाठी लढता-लढता
मागास झाला. या समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील
राहील.
राजे उमाजी नाईक यांचा इतिहास सामान्य माणूस व
तरुणाईपर्यंत जाण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्यासाठी
शासन आर्थिक मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी
दिली.
समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी
शासनाच्यावतीने न्यायमूर्ती बापट आयोगाच्या शिफारशींची छाननी करण्याचे काम सुरू
असून त्यावर बैठक घेऊन उचित शिफारस केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी
सांगितले. तसेच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून
देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, राजे उमाजी
नाईक यांचे देशासाठीचे कार्य मोठे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक समाजबांधव येतात. या समाजाच्या विकासासाठी
धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, वसतिगृह, प्रशिक्षण
या माध्यमातून हा समाज स्वत:च्या पायावर उभा राहावा, यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जातील, असे ते
म्हणाले.
वंचित समाजाला मान-सन्मान देण्याचे काम या
शासनाने केले आहे. राजे उमाजी नाईक यांची जयंती शासनाच्यावतीने साजरी करण्यासाठी
जलदगतीने शासन निर्णय काढल्याचे जलसंधारण
मंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
जलसंपदा राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी
पुरंदरची भूमी पावन असून येथे शक्ती आणि भक्तीचा संगम झाल्याचे सांगून राजे उमाजी
नाईक यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी पशु संवर्धन मंत्री श्री. जानकर, बाबाराजे
जाधवराव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत शितोळे यांनी केले.
जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी
भिवडी गावातील राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाला भेट देवून अभिवादन केले.
या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment