Friday, 7 September 2018

म्हैसमाळ- वेरुळ, खुलताबाद सुलीभंजन पर्यटन विकास आराखड्याचा वित्तमंत्र्यांकडून आढावा


पर्यटन विकास महामंडळाने ५० कोटी देण्याचे निर्देश

मुंबई दि. ७ : औरंगाबाद जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असून येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तमातील उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने शासनाने  ४३८.४४ कोटी रुपयांच्या म्हैसमाळ, वेरुळ- खुलताबाद आणि सुलीभंजन विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ५० कोटी रुपयांचा तर वन विभागाने २ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा असे आदेश आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार प्रशांत बंब, वित्त विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, सह व्यवस्थापकीय संचालक- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, एस.पी वडस्कर, उपवनसंरक्षक, उदय चौधरी- अपर जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या सह सार्वजनिक बांधकाम, पुरात्त्व विभाग, उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध जिल्हा असून या जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा अतिशय संपन्न आहे त्यामुळेच १७ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले,  या आराखड्यातील कामे पाच टप्प्यात करण्यात येणार आहेत. ही कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्ताने पर्यटन विभागासमवेत बैठक घेऊन परिपूर्ण नियोजन करावे, दर पंधरा दिवसांनी आराखड्यातील कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, यासाठी उत्तम आर्किटेकची नियुक्ती करावी.  पर्यटन मंत्र्यांसमवेत याची पुढील बैठक आयोजित करून आराखड्यातील कामांना गती द्यावी. वन विभागाने त्यांच्याशी संबंधित असलेली कामे १५ दिवसात निकाली काढावीत.
बैठकीत रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, गाव तळ्यांचा विकास, सिमेंट नाला बांध, नवीन गिरिजा माता तळे निर्माण करणे, विद्युत पुरवठा, पथ दिवे पाऊल वाटा, व्ह्यू पाँईटचा विकास, पगोडा, माहिती केंद्र, वृक्ष लागवड, दौलताबाद किल्ल्याचे जतन आणि संवर्धन, धर्मशाळांची बांधणी,  वाहनतळाची उभारणी, पर्यटक निवास बांधणे, ऐतिहासिक स्थळे, स्मारकांचे जतन आणि संवर्धन अशा विविध विकास कामांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
००००

No comments:

Post a Comment