सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना
मुंबई, दि. 6 : येत्या डिसेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्हा फ्लोराईड मुक्त करा अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
आज सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पजारे यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड युक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, फ्लोराईड युक्त पाणी पिणे ही आरोग्यासाठी गंभीर बाब असून यापुढे एकाही व्यक्तीला फ्लोराईड युक्त पाणी प्यावे लागणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. चंद्रपूर जिल्हा ‘ फ्लोराईड मुक्त करताना जिल्हा प्रशासनाने या क्षेत्रात उत्तम काम करणारा जिल्हा म्हणून एक चांगले मॉडेल विकसित करावे.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जुन्या झाल्याने त्याची दुरुस्ती करणे नवीन पाईप लाईन टाकणे, पाण्याचे पंप बसवणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर रुपांतरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. याशिवाय प्रादेशिक योजनेतील प्रत्येक गावातील पाण्याच्या टाकीजवळ बल्क मीटर बसवावे, फ्लोराईड बाधित गावांमध्ये डी-फ्लोराईड युनिट बसवावे, फ्लोराईड बाधित गावांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, प्रादेशिक योजनांच्या देखभालीकरिता ४ कोटीचा निधी तर जिल्हातील नादुरुस्त शौचालयासाठी ५ कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना देखील श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. कोळसा खाणीमुळे पाण्याच्या स्तरातील होणाऱ्या बदलाच्या अभ्यासासाठी निरीला पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आदर्श गाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सादर करा
चंद्रपूर जिल्ह्यातील २४ आदर्श गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव येत्या १५ दिवसात तातडीने सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आजच्या आढावा बैठकीत दिले. आरओ युक्त जिल्हा होण्यासाठी राज्यातल्या उत्तम कंपन्यांची निवड करून करावयाच्या कामांना गती द्यावी तसेच अतिशय दर्जेदार पद्धतीने ही कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
००००
No comments:
Post a Comment