मुंबई, दि. 31 : नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून ‘लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातील सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबई येथे दिली.
आज गिरगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ सभागृह येथे नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, तसेच या या भागातील नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार, माजी नगरसेवक संपत ठाकूर हे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, मीठ हे सकस अन्नघटक असून आरोग्यासाठी आयोडीनयुक्त मीठ आवश्यक असते. भारतातील आरोग्य सर्व्हेनुसार 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच लोह व आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रतिकिलो 14 रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नागरिकांना आयोडीन व लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमिया, इतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्यत्वे महिला व लहान बालके यांचा समावेश असतो. आहारातील लोह व आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात डबल फोर्टिफाईड शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
राज्यात जुलै महिन्यात नागपूर येथून आयोडिनयुक्त मीठ वाटप सुरुवात झाली असून राज्यात आतापर्यंत 3 लाख कुटुंबांनी या आयोडिनयुक्त मीठाची मागणी केली आहे. डबल फोर्टिफाइड मीठ बाजारात 24 ते 25 रु. प्रतिकिलो या दराने विकले जाते परंतु शिधावाटप दुकानामध्ये हे 14 रु. किलो दराने मिळणार आहे यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 2022 सालापर्यंत ॲनिमिया मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
००००
No comments:
Post a Comment