Thursday, 1 November 2018

पहिल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केले समाधान
नागपूर दि. 1, पहिल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. देशातील विविध महिला स्वयंसहायता बचत गट आणि व्यापाऱ्यांचे कायमस्वरुपी चेन नेटवर्कींग होणे गरजेचे आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून ते अधिक घट्ट करायचे असून, त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी सांगितले. ते दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. शरद डोणेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री. नेटके,  जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
राज्य शासन व ग्राम विकास व पंचायत राज यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय महालक्ष्मी  सरस प्रदर्शन 21 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ते उद्या दि. 2 नेाव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागी महिला बचत गटांच्या महिलांनी नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगितले.
यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तेलंगाना, हरयाणा, झारखंड, केरळ, सिक्कीम, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, मणिपूर, व कर्नाटक या राज्यांतून प्रदर्शन व विक्रीसाठी महिला स्वयंसहायता बचतगटातील महिला  सहभागी झाले आहेत. महिला बचत गटांच्या स्टॉल्समध्ये वारली, मधुबनी पेंटीग्ज, कोसा साडी, शर्टस, लाकडी खेळणी, काष्टशिल्प, मेटल आर्ट, कृषी आधारीत उत्पादने, पापड, लोचणे, विविध चटणी, हळद, मिरे पावडर, मातीची भांडी, यासह गृहोपयोगी वस्तू तसेच पारंपरीक दगडाचे जाते, कोल्हापुरी चप्पल, सँडल्स, जूट पिशवी, कारपेट आदी वस्तूंचा समावेश होता.
तसेच फूडझोनमध्ये  35 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागलेले असून, यामध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थंही आहेत. यामध्ये भेट देणाऱ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागपूरकर जनतेमुळे विविध महिला बचत गटांच्या वस्तूंची कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांच्या साहित्यांची विक्री झाली.
नागपूर येथील प्रदर्शनात जळगाव, कोल्हापूर येथील पापड, विविध प्रकारच्या चटणी, अहमदनगर येथील जाते यांची सर्वाधिक विक्री झाली. जामनेर येथील मुक्ताई महिला स्वयंसहायता बचत गटाच्या यमुना श्रीराम पाटील यांनी आणलेल्या विविध प्रकारच्या पापड, कुरड्या, ज्वारीचे धापोड आदि 82 हजार रुपये किमतीच्या खाद्यपदार्थांची विक्री झाली. आणि आता पुन्हा त्यांना ग्राहक आणि नागपुरातील विविध व्यापाऱ्यांनी दीड क्विंटलच्या पापड, कुरड्या, धापोडांची अतिरिक्त मागणी केल्याचे सांगितले. तसेच ऑनलाईन खरेदीची ऑर्डरही आता त्या घेत आहे. गेल्या 10 -12 वर्षांपासून त्या विविध भागात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात हे खाद्यपदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असल्या तरी आतापर्यंतची सर्वाधिक विक्री ही नागपूरात झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट झळकत होते.
  त्याशिवाय  आदिवासी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या आरती मोडक यांनीही असेच सांगत, त्यांच्याकडील 150 विविध प्रकारच्या पापड, कुरडी, कांदा पोहे, आदींपासून बनविण्यात येणारे खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळेल. तसेच असे प्रदर्शन वांरवार घेतल्यास महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी अधिक संधी मिळणार असल्याचे श्रीमती मोडक म्हणाल्या.
प्रबुध्द महिला बचत गटाच्या नवरत्न आडोळे यांनीही असेच अनुभव कथन केले. छायाबाई बारी यांनी त्यांच्याकडील लाकडी पोळपाटाची आतापर्यंतच्या विविध प्रदर्शनातील सर्वाधिक विक्री ही नागपुरात झाल्याचे सांगितले.  
गेल्या 10 दिवसांपासून नागपुरात राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्रीसाठी आलेल्या महिलांनी येथे राहण्याची उत्तम सोय झाल्याचे सांगत विक्रीचे ठिकाण व राहण्याचे ठिकाण यांच्यातील अंतर अगदीच कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना स्टॉल्सवर उशिरापर्यंत थांबून विक्री करता आल्याचेही सांगितले.
****



No comments:

Post a Comment