मुंबई, दि. ३० : नागपूर येथील शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्स या शासकीय मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना शासकीय पगार लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिवराज मुद्रणालयातील कार्यरत ५५ कर्मचाऱ्यांसाठी या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधीत सचिवांना दिले.
विधानभवन येथे आज या संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, शिवराज मुद्रणालयाचे संचालक मनोहर गायकवाड, व्यवस्थापक रु. दी. मोरे, लिथो प्रेस कामगार युनियनचे उपाध्यक्ष हरिनारायण शाहू, महासचिव श्रीराम मछले, सहसचिव शेखर मेश्राम, सदस्य उकंडराव सेवतकर आदी उपस्थित होते.
नागपूर येथील शिवराज मुद्रणालयाचे १९८४ मध्ये राष्ट्रीयीकरण करुन हे मुद्रणालय शासनाच्या मालकीचे घोषीत करण्यात आले आहे. पण या मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना अद्याप शासकीय निकषानुसार वेतन देण्यात येत नाही. त्यामुळे इतर शासकीय मुद्रणालयांप्रमाणे शासकीय निकषानुसार वेतन द्यावे, अशी येथील कामगारांची मागणी होती. त्याअनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांकडे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित विभागाने सुचविल्यानुसार अधिसंख्य पदे निर्माण करुन या मुद्रणालयातील कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, तसेच त्यांना शासकीय निकषाप्रमाणे वेतन सुरु करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी संबंधित दोन्ही सचिवांना दिले.
००००
No comments:
Post a Comment