मुंबई, दि. 30 : शाळांच्या पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. आता राज्यातील शाळांमध्ये ‘सरल’ प्रणाली सर्व विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे. त्यामुळे बोगस पट दाखविण्यास आता वाव राहिलेला नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले, 2011 मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये राज्यातील 1 हजार 404 शाळांमध्ये 50 टक्क्यापेक्षा कमी पटसंख्या आढळून आली होती. त्यानुसार त्या शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यादरम्यान संबंधित शाळा उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाकडे काही स्पष्टीकरणे मागविली होती. ती केल्यानंतर पुन्हा कारवाई सुरु करुन 11 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. पुन्हा या शाळा उच्च न्यायालयात गेल्यानंतर नैसर्गिक न्यायतत्वाची आवश्यक ती सर्व प्रक्रिया अवलंबण्याचे न्यायालयाने निर्देश दिले. त्यानुसार सर्व आवश्यक कार्यवाही करुन येत्या दोन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे श्री. तावडे म्हणाले.
‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 85 टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रणालीशी जोडण्यात आले असून ही प्रक्रिया शंभर टक्के व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही श्री. तावडे म्हणाले. या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment