मुंबई, दि. 1 : मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक क्रूझ टर्मिनल तयार करण्यात येत आहे. येत्या काळात जलवाहतुकीस चालना देण्यात येत असून क्रूझ पर्यटनास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी क्रूझ पर्यटनामध्ये गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन केंद्रीय जल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या परिषदेत उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. गडकरी बोलत होते. या परिषदेत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, प्राईस वॉटरहाऊस कॉपर्सचे प्रमुख हजिम गलाल, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह उद्योग जगतातील प्रमुख, कार्यकारी अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुंबईबरोबर माझे वेगळे नाते आहे. राज्यात मंत्री असताना अनेक कामे केली. आता मुख्यमंत्री श्री. फडणवीस त्यापुढे जाऊन अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करत असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, मुंबई पोर्ट ट्रस्टची मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्या जागांवर आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येणार आहेत. त्याचबरोबर अंतर्गत क्रूझ वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नुकतीच मुंबई गोवा क्रूझ सुरू केले असून त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे.
केंद्र शासनाकडून जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येत असून वॉटर टॅक्सी, मरिना प्रकल्प यांना चालना देण्यात येत आहे. नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार असून वॉटर टॅक्सीमुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यास व प्रदुर्षण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लवकरच मुंबई, नवी मुंबई, कोची व पुणे येथे इथेनॉलवर चालणाऱ्या बस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
श्री. गडकरी म्हणाले, राज्यात चार ठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहेत. जवाहरलाल नेहरू आर्थिक विकास क्षेत्रात येत्या दोन वर्षात सव्वा लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. सिडकोने सहकार्य केल्यास जेएनपीटी भागात नवीन शहर वसविण्यासाठी सहकार्य करू. तसेच मुंबईत गरीब रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुंबई दिल्ली मार्गावरील वाहतुकीचा वेळ वाचावा यासाठी मुंबई ते दिल्ली हा 12 पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. प्रभू म्हणाले की, मुंबईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविणारे हे पहिले शासन आहे. मुंबईची क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यात याव्यात. शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारण्याची व्यवस्था व्हावी. तसेच मुंबई ही सेवा क्षेत्रात पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचबरोबर सुरक्षा, झोपडपट्टी पुनर्वसन आदी विषयांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
पर्यावरणातील बदल हा मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरण बदलाला सामोरे जाणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत व्यवस्था उभारताना त्याची शाश्वतता तपासल्यास मुंबई ही जगातील सर्वोत्तम शहर होईल, असेही श्री. प्रभू यांनी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment