मुंबई दि. 1 : प्रत्येक मुलाच्या पालकांना आपल्या मुलाने उत्कृष्ट करीअर निवडून यश मिळवावे असे वाटते. मात्र असे करीत असताना पालकांनी आपल्या मुलांची रुची कशात आहे, मुलांचे छंद काय आहेत हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. मुलांनी सुध्दा आपल्या आवडीनुसार करीअर निवडण्याला प्राधान्य द्यावे असे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
मॅको बँकेच्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आज मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मॅको बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे यावेळी म्हणाले, आजचे युग हे माहितीचे युग आहे. माहितीचा हा अथांग सागर आपल्याला सहज उपलब्ध देखील आहे. विद्यार्थ्यांनी योग्य ती वाट निवडून त्याअनुषगांने जिद्दीने मेहनत केली तर यश नक्की मिळेल. मुलांच्या यशात त्यांच्या पालकांचादेखील सहभाग असतो. मुलांच्या यशामागे पालकांची व खास करून पाल्याच्या आईची मेहनत अधिक असते. पालकांनीदेखील अशाच प्रकारे आपल्या पाल्याला प्रोत्साहन दिले तर त्यांच्या पाल्याला यश खात्रीने मिळेल.
सोहळ्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८ मधील इयत्ता पाचवी मधील एकूण ४,आठवी मधील १०,दहावी मधील ९० तर बारावीतील एकूण ३९ विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे एकूण १४३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
००००
No comments:
Post a Comment