दादर परिसरात प्रदूषण
नियंत्रण मंडळाची कामगिरी
मुंबई, दि. 29 : दादर परिसरात असलेल्या फूल आणि भाजी मार्केट मध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक वेस्टन आणि नॉन वोवन बॅग्ज वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज धडक कारवाई करुन 35 हजार रुपयांचा दंड वसूल करुन 144 किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.
प्लास्टिक बंदी अंतर्गत फुलांची सजावट, बुके, यांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी असून देखील मुंबई शहरातील दादर परिसरात पहाटे सुरु होणाऱ्या घाऊक फूल बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा, प्लास्टिक वेष्टन, नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन याचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाला मिळाली. त्याचबरोबर दादर पश्चिमच्या भाजी मार्केट मध्ये देखील प्लास्टिक बंदीच्या नियमनाचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने पहाटे ५ वाजता दादरच्या फूल मार्केट व भाजी मार्केटमध्ये धडक मोहीम हाती घेऊन विक्रेत्याकडून ३५ हजार रुपयाचा दंड व 144 किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.
मुंबई शहरातील दादरचे फूल मार्केट व भाजी मार्केट हे घाऊक मार्केट म्हणून ओळखले जाते. या मार्केटमध्ये सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लाखो रुपयांच्या फुलांची व भाजीची घाऊक विक्री होत असते. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी अंतर्गत फूल बाजारात व भाजी बाजारात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक वेष्टन, नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन यांच्या वापरावर मार्च २०१८ पासून बंदी आणली आहे. तरी देखील या मार्केटमध्ये याचा सर्रास वापर केला जात असल्याचे लक्षात आल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी देविदास कोपरकर, क्षेत्र अधिकारी दर्शन म्हात्रे, संदिप पाटील व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निरीक्षक रमेश घाडगे यांनी संयुक्तरित्या केली. अशा प्रकारची धडक कारवाई हे भरारी पथक मुंबई शहरात अन्य ठिकाणी करणार आहे.
000
No comments:
Post a Comment