चौथी जागतिक आपत्ती
व्यवस्थापन परिषद
मुंबई, दि. 30 : पूर
परिस्थितीत अडकल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी वापरण्यात येणारी साहित्ये,
भूकंपात पडझड झालेल्या इमारतीच्या मलब्याखाली अडकलेले जीव शोधणारी
सेन्सर्स याबरोबरच भारतीय प्रौद्योगिक संस्था अर्थात आयआयटी बॉम्बेच्या नव्या
दमाच्या संशोधकांनी तयार केलेली जलद संपर्कासाठीचे पतंग बलून, हवा व पाणी शुद्ध करणारी यंत्रे अशा विविध नाविन्यपूर्ण संशोधन साहित्याची
मांडणी असणारे प्रदर्शन चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेच्या निमित्ताने
मांडण्यात आले आहे.
चौथ्या जागतिक आपत्ती
व्यवस्थापन परिषदेचे आयोजन करण्याचा मान यंदा महाराष्ट्र शासनाला मिळाला आहे. या
परिषदेच्या निमित्ताने आयआयटी, पवई येथील कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयाच्या
मैदानात हे आगळे वेगळे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यामध्ये आपत्ती
निवारणाशीसंबंधित विविध संस्था, संघटना व यासंबंधीचे साहित्य
तयार करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शानात राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारतीय
प्रौद्योगिक संस्था, पवई, महाराष्ट्र
शासनाचे मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती
व्यवस्थापन कक्ष, बृहन्मुंबई अग्निशमन दल, यांच्यासह केलेल्या विविध आपत्ती व्यवस्थापन विषयीची उपकरणे व साधनांची
निर्मिती करणाऱ्या 70 हून अधिक कंपन्यांच्या सहभाग आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाच्या स्टॉलवर आपत्ती काळात वापरण्यात येणारी साधने उदा. वातावरणातील रेडियस
शोधणारी, पाण्यातील विष ओळखणारी यंत्रे, जीवरक्षक साधने,
बोटी, आदींचा समावेश त्यात आहे. राज्य आपत्ती
प्रतिसाद दलाच्या स्टॉलवरही दुर्घटनेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा तसेच
त्याच्या उपयोगांची माहिती देण्यात येत आहे.
नैसर्गिक दुर्घटनेच्या वेळी
सर्व संपर्क यंत्रणा बंद पडतात. अशावेळी जलद प्रतिसादासाठी संपर्क यंत्रणा प्रस्थापित
करणे आवश्यक असते. त्यासाठी आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांनी पतंग बलूनच्या
सहाय्याने संपर्क यंत्रणा निर्माण करणाऱ्या यंत्राचे संशोधन केले आहे. हलके, वाहतुकीस
सुलभ व तातडीने कामास येणारे हे बलून जोरदार वाऱ्यातही स्थिर राहून संपर्क साधू
शकते. तसेच यामध्ये कॅमेरे, जीपीआरएस यंत्रणा, ध्वनिवर्धक यंत्रणा बसविण्याची सोयही आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात झटपट
संपर्कासाठी हे बलून उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तर वैद्यकीय क्षेत्रात
प्रयोगासाठी उपयुक्त ठरणारे मोबाईल मायक्रोस्कोपचे संशोधन दुसऱ्या एका
विद्यार्थ्यांच्या गटाने तयार केले आहे. याद्वारे मोबाईलच्या माध्यमातून
मायक्रोस्कोपचा वापर करता येणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे उपकरण उपयुक्त
ठरणार आहे. तर पाण्यातील वस्तू शोधणारे रोबोटही या प्रदर्शनात पहावयास मिळत आहे.
याशिवाय विविध कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापन काळात उपयुक्त असणारे मास्क, ड्रोन,
पोशाख व इतर साहित्यांची प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन
महामंडळाच्या स्कूबा डायव्हिंग संस्थेचे स्टॉलही येथे आहे. भारतीय हवामान
खात्याच्या स्टॉलवर देशातील हवामानाची उपयुक्त माहिती आहे. बृहन्मुंबई
महानगरपालिकेचे कोस्टल रोड,
भारतीय नौदलाची आपत्ती व्यवस्थापन साधने, ओडिशा
शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी स्टॉलही या ठिकाणी आहे.
आपत्ती निवारण क्षेत्रातील
नवनव्या संशोधनाची,
साहित्यांची माहिती असणाऱ्या या प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी नागरिक,
आयआयटीएन्स विद्यार्थी, प्राध्यापक, देशविदेशातून परिषदेला आलेल्या प्रतिनिधींनी गर्दी केल्याचे दिसत आहे.
००००
No comments:
Post a Comment