मुंबई, दि. 27 : ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांच्या
बळकटीकरणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आढावा बैठक घेत आहेत. नुकतीच त्यांनी
उरण, धुळे येथील आरोग्य संस्थांच्या बांधकामांबाबत आढावा
घेतला.
विधानभवन येथे
झालेल्या बैठकीत रुग्णालयांच्या बांधकामांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार
मनोहर भोईर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त
अनुप कुमार यादव, सह आयुक्त डॉ. सतीश पवार, संबंधित जिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित
होते.
उरण तालुक्यात मोठ्या
प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. मात्र त्यामधील कामगारांचे अपघाताचे प्रमाण पाहता
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक आहे. सामाजिक उत्तरदायित्व
निधीच्या साहाय्याने रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री
श्री. शिंदे यांनी सांगितले.
उरण तालुक्यात ३० खाटांचे
शासकीय रुग्णालय कार्यरत आहे. सद्यस्थिती लक्षात घेता १०० खाटांच्या उपजिल्हा
रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे. हे बांधकाम करण्यासाठी
अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांकडे
प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या
रुग्णालयामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळतील व तिथे राहणाऱ्या
जवळपास सव्वादोन लाख नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
धुळे येथील महिला
रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करावे. जेणेकरुन या भागातील रुग्णांना त्याचा लाभ
मिळेल. या रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन ते विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी
आरोग्यमंत्र्यांनी दिले.
००००
No comments:
Post a Comment