आरोग्य विमा
संरक्षणावरील चर्चासत्राचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 1 : राज्यात महात्मा फुले जनआरोग्य
योजनेंतर्गत 2 कोटी 22 लाख कुटुंबाना
आरोग्य विमा संरक्षण दिले जात आहे. त्याचा सुमारे राज्यातील 22 लाख रुग्णांना फायदा मिळाला आहे. खर्चिक वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य
विमा कवच उपयोगी असून त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ
शिंदे यांनी आज येथे सांगितले.
फ्री प्रेस जर्नल व
दै. नवशक्ती यांद्वारे आयोजित ‘हेल्थ इन्शुरन्स राईट डायग्नोसीस राईट
प्रिस्क्रिप्शन’ चर्चासत्रात
ते बोलत होते.
आरोग्यमंत्री श्री.
शिंदे यावेळी म्हणाले,
सामान्य माणसाला खासगी आरोग्य सेवा परवडण्याजोग्या नसतात. त्यामुळे
आरोग्य सेवेवरील खर्चामुळे आर्थिक संकटात लोटले जाणाऱ्यांची संख्या खुप आहे.
आरोग्य विमा हा अत्यंत महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित असा विषय आहे. त्याविषयी
सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. शासनामार्फत नेहमीच सामान्यांना
दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जातात. महागड्या वैद्यकीय
खर्चाच्या उपचारांसाठी आरोग्य विमा संरक्षण उपयुक्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी
सांगितले.
राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 2 कोटी 22 लाख कुटुंबाना आरोग्य विमा संरक्षण दिले जात आहे. त्याचा सुमारे
राज्यातील 22 लाख रुग्णांना फायदा मिळाला आहे. यासोबत
आयुष्यमान भारत योजेनेंतर्गत राज्यातील 83 लाख कुटुंबाना
फायदा दिला जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मोफत आरोग्य सुविधा
सार्वजनिक आरोग्य
सेवा सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अनेक योजना राबवित आहे. कल्याण
डोंबिवली येथे सार्वजनिक खासगी सहभागीदार तत्वावर एम.आर.आय सेवा पुरविण्यात येत
आहेत. त्याचबरोबर डायलिसीस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यात दीड लाख
आरोग्य केंद्रे निर्माण करण्यात येत आहेत. सामान्य जनतेला मोफत आरोग्य सुविधा
पुरविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राज्यात विविध ठिकाणी सुरु
करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी नवशक्ति-फ्री
प्रेस जर्नलचे संचालक अभिषेक कर्नानी, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे
मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक बाठवल तसेच खासगी आरोग्य विमा कंपन्यांचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment