विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी, बारावीची परिक्षा अत्यंत महत्वाची
मुंबई, दि. 1 : राज्यात सध्या दहावी
आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. या दोन्ही परिक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला
कलाटणी देणाऱ्या असतात. विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक
असून याकामी एसटीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटीच्या वाहक
आणि चालकांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य करीत त्यांना परिक्षा केंद्रावर
वेळेत पोहोचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे
अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
मंत्री श्री. रावते म्हणाले, महत्वाच्या
काळात प्रवाशांच्या मदतीला एसटी नेहमीच तत्पर असते. अशा वेळी एसटी महामंडळाचे
कर्मचारी, चालक, वाहक हे नेहमीच समर्पणाने काम करतात. आपल्या वैयक्तिक
अडीअडचणी बाजूला सारुन एसटी चालक, वाहक हे प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य देतात.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा
असतो. त्यामुळे या परिक्षेच्या काळातही एसटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या नेहमीच्या समर्पण भावनेने काम करावे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रावर वेळेच्या आधी
पोहोचविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यासाठी आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांनी
आपली ड्युटी सुरु होण्याच्या काही वेळ अगोदर ड्युटीवर पोहोचावे. आपली स्वत:ची मुले
परिक्षेस सामोरे जात आहेत असे समजून समर्पणभावनेने विद्यार्थ्यांना सेवा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी केले आहे.
विद्यार्थी वेळेत परिक्षा केंद्रावर पोहोचू शकले तर ते कोणत्याही
तणावाशिवाय परिक्षेला सामोरे जाऊ शकतील. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना
वेळेच्या आधी परिक्षा केंद्रावर पोहोचविल्यास त्यांचा तणाव कमी होऊ शकेल. आपली
ड्युटी किती तास झाली यापेक्षा आपण विद्यार्थ्यांची सेवा करु शकलो आणि उद्याचे
सक्षम नागरिक घडविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो ही भावना महत्वाची आहे, असेही मंत्री श्री. रावते यांनी आवाहन करताना सांगितले.
एसटीचे विभाग नियंत्रक, आगार
व्यवस्थापक, कामकाज वाटप करणारे
पर्यवेक्षक यांनी कर्मचाऱ्याअभावी किंवा गैरहजर कर्मचाऱ्यामुळे एसटीची एखादीही
फेरी रद्द किंवा विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना परिक्षेस
वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी
करावी, असे निर्देश मंत्री श्री.
रावते यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासंदर्भात कोणतीही गैरव्यवस्था निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी हे कारवाईस पात्र राहतील, अशी सूचनाही मंत्री श्री. रावते यांनी केली आहे.
००००
No comments:
Post a Comment