सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: पालघर- 7, रायगड- 8, रत्नागिरी- 1, नाशिक- 74, धुळे- 1, जळगाव- 1,अहमदनगर- 10, पुणे- 3, सातारा- 3, सांगली- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 1, लातूर- 2, नांदेड- 1, अकोला- 1, यवतमाळ- 3, वाशीम- 1, बुलडाणा- 1,वर्धा- 4 आणि चंद्रपूर- 22. एकूण- 146.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, पालघर- 2, रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 3,अहमदनगर- 1, नंदुरबार- 2, पुणे- 3, सोलापूर- 1, सातारा- 6, औरंगाबाद- 4, नांदेड- 8, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, वाशीम- 5, बुलडाणा- 1, चंद्रपूर- 1आणि भंडारा- 5. एकूण- 62.
No comments:
Post a Comment