प्र. प. क्र. 383
नागपूर दि.4 :पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 11 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. यावर प्रतिबंध म्हणून बालमृत्यू रोखण्यासाठी 9 जूनपर्यंत चालणारा अतिसार नियंत्रण पंधरवडा सर्व स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून राबवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभगृहात आज जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, जिल्हा लसीकरण अधिकारी असिम इनामदार, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी श्रीमती सुरेखा चौबे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके म्हणाले, 9 जून 2019 पर्यंत चालणाऱ्या विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यात विशेष जनजागृती कार्यक्रम, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावा, याबाबत संबंधितांना माहिती द्यावी. तसेच ओआरएस व झिंक या गोळ्यांचे घरोघरी वाटप, कुपोषित बालकांवर उपचार, स्तनपान व बालकांचे पोषण याबाबत आशांच्या सहकार्याने या पंधरवड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अतिसार रोखण्यासाठी असलेल्या रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरणात समावेश झाल्याची माहिती पालकांपर्यंत पोहचावी यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात आला आहे.‘रोटा व्हायरस’ हा विषाणू मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. ‘रोटा व्हायरस’ संसर्गाचा आरंभ सौम्य अतिसाराने होऊन तो पुढे जाऊन गंभीर स्वरुप धारण करु शकतो. तसेच पुरेसा उपचार न मिळाल्यास शरीरांमध्ये पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन प्रसंगी बालकाचा मृत्यू देखील ओढावू शकतो. यासाठी ही लस मुलांना अनुक्रमे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांपर्यंत तीन वेळा तोंडावाटे द्यावी. ही लस सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर सौम्य आणि तात्पुरती लक्षणे जसे उलटी, अतिसार, खोकला, सर्दी, चिडचिड, भुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. कुपोषित मुलांवर त्वरित उपचार न झाल्यास अतिसार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. यासाठी ‘रोटा व्हायरस’ लसीकरण बालकांमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे.
लसीकरणाबाबत माहिती देतांना जिल्हा लसीकरण अधिकारी असिम इनामदार म्हणाले, भारतामध्ये जी मुले अतिसारामुळे रुग्णालयात भरती होतात, त्यापैकी 40 टक्के मुले रोटा व्हायरस संक्रमणाने ग्रस्त असतात. देशात 78 हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. त्यापैकी 59 हजार बालमृत्यू मुलांच्या पहिल्या दोन वर्षामध्ये होतो.
****
No comments:
Post a Comment