Thursday, 21 November 2019

‘जागो ग्राहक जागो’ चळवळीने ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करा - रवींद्र ठाकरे



* एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत विविध विषयावर मंथन
नागपूर, दि.21 : बाजारपेठेत उत्पादक आणि ग्राहक हे महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी एक जरी अनुपस्थित असेल तरीदेखील बाजारपेठेवर परिणाम होतो. त्यामुळे उत्पादक हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजना बाजारात आणतात. याद्वारे ग्राहकांची लूट किंवा ग्राहकांची दिशाभूल तर केली जात नाही ना, याकडे ‘जागो ग्राहक जागो’ या चळवळीच्या माध्यमातून लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे बाजारपेठेचा एक भाग असलेल्या ग्राहकांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
अजब बंगला संग्रहालयाजवळील अन्नधान्य वितरण कार्यालय येथे आज ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेंतर्गत अशासकीय अधिकारी व सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे बोलत होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य अविनाश प्रभुणे, अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, अनिल सवई , जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रवीद्रं ठाकरे यांनी ‘ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा’ ही संकल्पना स्पष्ट करतांना म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आकर्षक जाहिराती ग्राहकांना नवनवीन आमिषे दाखवून बळी पाडत असतात. अशावेळी ग्राहकांनी बाजारपेठेत किंवा ऑनलाईन खरेदी करतांना सजगता ठेवावी. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी नवीन तंत्रज्ञान  उपयोगात आणून ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने  स्विकाराव्यात. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात नागपूर शहरामध्ये मोबाईल ॲपद्वारे तक्रारी स्विकराण्यास सुरवात करावी.  तक्ररी स्विकारण्याची पद्धत सुटसुटीत ठेवावी. महिला वर्ग वस्तू खरेदी करतांना विशेष चोखंदळ राहतात. महिलांमध्ये ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेंबद्दल जागरूकता निर्माण झाल्यास संपूर्ण कुटुंबास त्याचा फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात जिल्हा तक्रार निवारण मंचचे सदस्य अविनाश प्रभुणे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राज्य व जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रीयेमध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण तसेच रेरा कायद्याबाबत मार्गदर्शन केले. अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांनी अन्न सुरक्षा कायदा, ई-पॉस मशिन, भेसळ तसेच वस्तूंचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. तर कृषी क्षेत्रातील शासनाच्या योजनांविषयी जिल्हा कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी माहिती दिली. वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक एन.पी.जोशी यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरणाबाबत उपस्थितांना माहिती दिली. ग्राहक चळवळीसाठी कार्य करणाऱ्या डॉ. प्रा. कल्पना उपाध्याय यांनी ग्राहकांचे विविध हक्क निवडीचे स्वातंत्र्य, माहिती मिळविण्याचा हक्क त्याचप्रमाणे शेतकरी, प्रवासी, वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यांचे निवारण व उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप दोंडके यांनी वीज क्षेत्रातील शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर यांनी प्रस्तावना केली, संचालन  श्रीमती कोमल रोडे यांनी तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे  यांनी मानले. यावेळी निरीक्षक, वैधमापन शास्त्र, पुरवठा निरीक्षक, जिल्हा पुरवठा कार्यालय प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
*****  

No comments:

Post a Comment