नागपूर, दि. 21 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर येथे रुग्णांना चांगल्या व उच्चदर्जाच्या
सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासन प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधी व त्यातील संबधित
अधिकाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात
येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज
विधानपरिषदेत दिली. यासंबधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिल सोले यांनी मांडली होती.
श्री. थोरात म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संलग्नित
अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे
उपचारार्थ येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या 550 ते 600 असून दररोज साधारणत: 230 ते
250 आंतररुग्ण दाखल होत असतात. या रुग्णालयातील दैनंदिन स्वच्छतेची कामे कंत्राटी
सेवेच्या कर्मचाऱ्यांकडून व संस्थेच्या नियमित सफाईगार कर्मचाऱ्यांकडून केली जाते.
रुग्णालयाची इमारत चार मजली असून
त्यामध्ये दोन उद्ववाहने कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना
करावा लागत नाही. रुग्णालयाच्या वॉर्डातील जैविक कचरा संकलन केंद्रात ठेवला जातो.
हा जैविक कचरा नागपूर महानगरपालिका मान्यताप्राप्त कंपनीकडून संकलन केंद्रातून
दररोज उचलला जातो. रुग्णालयामधील अजैविक कचराही महानगरपालिकेमार्फत उचलला जातो.
यामुळे दुर्गंधी पसरत नाही. रुग्णालयातील रुग्णांना लागणारे जेवण रुग्णालयातील
पाकगृहातून व आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयार केले जाते. जेवणाच्या
दर्जाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. रुग्णांना पोषक आहार
आवश्यक असणाऱ्या कॅलरीजप्रमाणे पुरविला जातो. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णाच्या
आरोग्याबाबत व त्याअनुषंगाने पुरवावयाच्या सुविधेबाबत योग्य काळजी घेतली जाते.
तरीसुद्धा नागरिक व लोकप्रतिनिधींना यांबाबत काही शंका असल्यास संबंधीतांची लवकरच
रुग्णालयात बैठक आयोजित केली जाईल, असे श्री.
थोरात यांनी सांगितले.
या चर्चेत डॉ.रणजित पाटील, रामदास आंबटकर, नागोराव गाणार, गिरीष व्यास, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, निलय नाईक
आदींनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment