Saturday, 21 December 2019

सेवा हमी कायद्यात उत्तम काम करणाऱ्यांना पुरस्कार द्या - संजय कोठारी


नागपूर, दि 21:  सेवा हमी कायद्यात  जनतेला वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने सेवा दिली नाही तर शासकीय कर्मचाऱ्यांना  दंड करण्यापेक्षा त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करून  चांगल्या कामासाठी पुरस्कार देण्याची व्यवस्था केल्यास  या कायद्याची अंमलबजावणी चांगली होईल असा विश्वास राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांनी व्यक्त केला.
 सार्वजनिक सेवेत सुधारणा- शासनाची भूमिका यावर हॉटेल रॅडीसन ब्ल्यू मध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय विभागीय परिषद सुरु आहे. या परिषदेच्या द्वितीय सत्रात  कायद्याच्या अंमलबजावणीमुळे सार्वजनिक सेवेच्या वितरणात सुधारणा करण्यात कशी मदत झाली  या सत्राच्या अध्यक्ष स्थानावरून  श्री कोठारी बोलत होते. या सत्रात  सेवा हमी कायद्याचे महाराष्ट्राचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, पंजाबचे मुख्य आयुक्त मनदीपसिंग संधू, हरयानाचे मुख्य आयुक्त हरदीप कुमार उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी काळासोबत बदलले पाहिजे, भारत हा उज्ज्वल भविष्य असणारा देश आहे. त्याचा आदर ठेऊन त्याप्रमाणे वागा. नवीन अधिकाऱ्यांना या कायद्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला सांगा. या कायद्याची प्रक्रिया समजून घेणे  हे सुद्धा एकप्रकारचे मोठे शिक्षण आहे, असेही त्यांनी   सांगितले.
 महाराष्ट्रातील या कायद्याची अंमलबजावणी प्रक्रिया सांगताना स्वाधीन क्षत्रिय म्हणाले की, कोणत्याही गोष्टींची ओळख त्याच्या बोधचिन्ह  आणि घोषवाक्याने होते. त्यामुळे राज्यात यासाठी खुली स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये  उत्तम बोधचिन्हासाठी 20 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. 'तुमची सेवा आमचे कर्तव्य' हे राज्याचे घोषवाक्य सुद्धा जनतेने ठरवलेले आहे. 
राज्यात 30 हजार 800 आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून 486 सेवा  या कायद्यांतर्गत देण्यात येत आहेत. निश्चित कालावधीत येणाऱ्या अर्जाचा निपटारा ही अतिशय महत्त्वाची तरतूद या कायद्यात आहे. राज्यात 64 टक्के निपटारा हा ठरलेल्या कालावधीत झालेला आहे. यासाठी राज्यात ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येते.  या कायद्यामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला पाहिजे. त्यातही जो प्राधिकृत अधिकारी आहे त्याला हे पुरस्कार प्राधान्याने दिले पाहिजेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी मनदीपसिंग संधू यांनी पंजाब राज्यात या कायद्यांतर्गत 508 सेवा अंतर्भूत केल्या आहेत. यामुळे जनतेला भ्रष्टाचार मुक्त, प्रभावी, सक्षम आणि तात्काळ सेवा पंजाब शासन जनतेला देत आहे.  लोकांना वेळेत सेवा देण्याची कार्यसंस्कृती पंजाब मध्ये स्वीकारली आहे. या कायद्यांतर्गत 13 कोटी 80 लाख 91 हजार 913 अर्ज मिळाले असून 13 कोटी 78 लक्ष 60 हजार 252 अर्जाचा निपटारा वेळेत केला आहे. दर महिन्यात 1 लक्ष अर्ज येतात.
असेही त्यांनी यावेळी सांगितले.  सर्व अभिलेख्यांचे डिजिटायझेशन केल्यामुळे लोकांना सेवा देणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. हरयाणा सरकारने 2014 मध्ये हा कायदा लागू केल्याचे हरदीपकुमार यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्यामध्ये अनेक वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कायद्याचा प्रचार केला. मात्र सेवा हमी कायद्यात तसे नाही. त्यामुळे सरकारलाच या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी पुढे येऊन लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल, असेही ते म्हणाले. 
या परिसंवादात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सार्वजनिक सेवांचे वितरण, सेवा हमी कायद्याबाबत समाजात जनजागृती करणे या विषयावर सुद्धा  मांडणी करण्यात आली. यावेळी विविध राज्यातून आलेल्या अधिकाऱ्यांनी मनमोकळा संवाद साधला.
000


No comments:

Post a Comment