Tuesday, 28 January 2020

हातपाटी वाळूच्या दरातील तफावत दूर करणार - बाळासाहेब थोरात


मुंबई, दि. 28; पारंपरिक व्यवसाय करणा-या हातपाटी वाळू उत्पादकांसाठी वाळू उत्खननासाठी प्रतीब्रास  हातची किंमत ठरवितांना येणारी तफावत दूर व्हावी यासाठी सर्वंकष विचार करून ही तफावत दूर करावी अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या कोकण विभागातील तीन जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
            राज्यातील वाळू उत्खनन संदर्भातील निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार विना लिलाव परवाना पद्धतीने डुबी/ हातपाटीद्वारे वाळू  उत्खननासाठी राखिव गट यामधून पारंपरिक व्यवसाय करणा-या स्थानिक व्यक्तिंना तसेच अशा व्यक्तींच्या संस्थांना परवाने देण्यासाठी पर्यावरण व वन मंत्रालयाच्या नियमांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. तथापि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार 0 ते 5 हेक्टर क्षेत्रासाठी जनसुनावणी घेण्याची अट आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत श्री. थोरात यांनी संबधितांना सूचना दिल्या.
            शासनाचे वाळू/रेती निर्गती धोरण दिनांक 21 मे 2015 प्रमाणे दरवर्षी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई यांच्या वतिने त्यांच्या कडून प्राप्त होणा-या सर्वेक्षण व गट निश्चिती अहवालानुसार नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाळू/रेती निर्गती प्रक्रिया करण्यात येते. याकरिता हातपाटीद्वारे रेती उत्खनन परवाना देण्यासाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार हातची किंमत (अपसेट प्राईस)ठरविण्यात येते.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, सिंधूदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी, आमदार श्रीमती हुस्नबानो खलिफे, आमदार शेखर निकम, माजी आमदार माणिक जगताप  यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी व संबधित अधिकारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment