Saturday, 15 February 2020

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगार भरती मेळावे आयोजित करावेत -सुनील केदार



        नागपूर, दि. 15:  अभ्यासक्रम पूर्ण होताच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय उभारता यावा यादृष्टीने रोजगार मेळावे व  मार्गदर्शन केंद्र लवकरच आयोजित करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.
           गणेशपेठ येथील दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात श्री. केदार यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रोजगार मेळावे व मार्गदर्शन केंद्र आयोजित करण्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण  सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, सहाय्यक संचालक मिलिंद घडे, जिल्हा व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुधा ठोंमरे, सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप लोणारे, कळमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार केतन सोनपिंपरे आदी उपस्थित होते.
         आजच्या काळात उद्योगधंद्यांची वाढती संख्या लक्षात घेता कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची  नितांत गरज आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सावनेर तसेच कळमेश्वरला लवकरच रोजगार मेळावे व मार्गदर्शन केंद्र आयोजित करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी संबंधितांना दिले. रोजगार मेळावे व मार्गदर्शन केंद्रामध्ये मोठमोठ्या नामांकित कंपन्यांना बोलविण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राला यात सहभागी करण्यात येईल. यामध्ये मेट्रो, मॉईल, डब्युसीएल, टाल (टाटा एरोनॉटिकल्स लि.)या सारख्या कंपन्यांचा यात समावेश असेल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सूतगिरण्यांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम राबवा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.   
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयीसुविधा पुरवाव्यात. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यादृष्टीने प्रयत्न करावेत. वसतिगृहात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्‍ध होईल, याला प्राधान्य देण्यात यावे, असे ते यावेळी म्हणाले. वसतीगृहाच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांवर लवकरच भरती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
      
                                                                      *******
 

No comments:

Post a Comment