नागपूर, दि.22 : काटोल-नरखेड तालुक्यात सिंचनासोबतच पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. यासोबतच कार प्रकल्पाची ऊंची वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
काटोल आणि नरखेड परिसरात पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी वापरण्यात येणा-या पाण्याचा अभाव असल्यामुळे शेतीवर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतीला सिंचनाच्या सुविधा मिळाल्यास या भागातील शेतीत संत्र्यांसोबत विविध पिकांचे उत्पादन घेता येणे शेतक-यांना सुलभ होणार आहे. यासाठी हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहे. श्री. देशमुख यांनी सिंचन व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची रविभवन येथे आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख यांच्यासह जि. प. सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बानाबाकोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
काटोल- नरखेड तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेताना पाणी उपलब्धतेनुसार त्या-त्या भागातील तलाव बांधकामांची मंजुरी मिळविण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. नरखेड व सावरगाव परिसरातील गावांच्या पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कन्हान नदीवरील कोच्छी धरणातून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करुन घेता येईल. सिंचन प्रकल्पांच्या निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी अधिवेशनादरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठकही घेण्यात येईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
हिंगणखेडा प्रकल्पाची उंची वाढविणे, जाम प्रकल्पाचे पाणी पेठ, मिर्झापूरपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कालव्यात वाढलेली झुडपे तोडून होणारी पाणीगळती थांबवित पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्याच्या सूचना केल्या. तसेच बोर सिंचन प्रकल्प, मदार नदीवर बांधण्यात येणा-या चार बंधाऱ्यांच्या कामांचा आढावा घेताना निधीची अडचण असल्यास तसे प्रस्ताव तयार करा. याकामी जिल्हा परिषद सदस्य आणि पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे मार्गी लावण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी कार उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास सात गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. चिखली, जाम, थडी पवनी प्रकल्प, खरपडी प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच वर्धा नदीवरील देवळी बंधा-याचे अर्धवट झालेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी सिंचन व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी अमरावती जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्याबाबत सांगितले.
******
No comments:
Post a Comment