Sunday, 8 March 2020

पाटणसावंगी येथील क्रीडासंकुलांचा स्थानिकांना लाभ व्हावा - केदार


            नागपूर दि. 8 : पोलिस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, अशा पद्धतीने, उत्कृष्ट सोयीसुविधांनी युक्त असे क्रीडा संकुल पाटणसावंगीत उभारण्यात येणार असून, त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज दिले.
  पाटणसावंगीचे सरपंच अजय केदार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे अपर आयुक्त हेमंत पवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, ग्रामसचिव श्री. श्रृंगारे यावेळी उपस्थित होते.
            अर्धवर्तुळाकार क्रीडा संकुलात रनींग ट्रॅक उभारत असताना विशेष काळजी घेण्याचे सांगून, श्री. केदार म्हणाले की, इनडोअर क्रीडा संकुल न उभारता, खेळती हवा, योग्य प्रकाशयोजना, मुबलक पाणीपुरवठा, सुलभ आणि स्वच्छ शौचालय उपलब्ध करावे. बांधकाम करताना व्हेंटीलेशनवर विशेष लक्ष द्यावे. ग्रीन जीम, लांब व उंच उडी मारण्यासाठी आवश्यक साधनाची क्रीडा संकुलात व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सांगितले.
     युवकांना पोलिस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेप्रमाणे योग्य साहित्य, ट्रॅक आणि इतरही बाबी विचारात घेऊन  क्रीडा संकुलांचे बांधकाम करा. त्यामध्ये अडचणी येत असतील तर संबंधित विभागाशी समन्वय ठेवून पाठपुरावा करावा अशा सूचना श्री. केदार यांनी दिल्या.
*****

No comments:

Post a Comment