नागपूर, दि. 7 : नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय(मेयो) तसेच शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यासारख्या मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी करून, ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर अत्याधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलत होते.
गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. व्ही. पातूरकर यांच्यासह माजी आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे सावरगाव व परिसरातील रुग्णांना सात आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. टोपे म्हणाले येथील आरोग्य केंद्राला मुबलक पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या घरासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्यामुळे योग्य सुविधा व बांधकाम तात्काळ पूर्ण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील नादुरुस्त रुग्णवाहिका काढून येत्या 3 महिन्यात त्या बदलून नव्या देण्यात येतील. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आमदार निधीतूनही काही निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी करत, तेथील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची निर्मिती व अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रांमधून ग्रामीण आरोग्य उत्तम राखण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील साडेअकरा हजार उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र ठरविण्यात येत आहेत. त्यातून संसर्गजन्य व असंसर्गजन्य 13 सेवांचे तात्काळ निदान झाले पाहीजे. कर्करोगाला न घाबरता, त्या आजारांचे वेळीच निदान करणे गरजेचे असल्याचे सांगत आशासेविकांनी घरोघरी जावून रुग्णांना रुग्णालयात आणण्याचे काम करण्याच्या सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समितीला विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर नेमण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात हृदयरोग तसेच पक्षघात, मेंदूज्वर आदि असाध्य रोगांचे निदान करण्याची व्यवस्था करणार असून, इसीजी मशीन, सीटीस्कँन, 24 प्रकारच्या रक्तचाचण्यांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहून वेळोवेळी चाचण्या करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आरोग्य सेविका व आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याविषयी सकारात्मक विचार करू, नरखेड, भिष्णूर व बोरघड प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लवकरच पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत जिल्ह्यातील मोठ्या खाजगी रुग्णालयांचा समावेश करण्याबाबतचे प्रस्ताव देण्याचे निर्देश यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतंर्गत अंगणवाडी व शाळेतील बालकांची तपासणीबाबत ग्रामपंचायतीने दक्ष राहण्याचे आवाहन केले.
मागील अनेक वर्षांपासून काटोल - नरखेड भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रलंबित होती. ती लवकरच पूर्णत्वास जातील, असे सांगून गृहमंत्री देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्याबाबत सूचना केल्या. अवैध सावकारी, मद्यविक्री तसेच सट्टा आदि धंदे बंद करण्याचे निर्देश पोलिस विभागाला दिले. राज्यात पोलिसांची लवकरच आठ हजार भरती करणार असून, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातील नरखेड येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत असून, सात हजार महिला व पुरुष रक्षकांची भरती करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार गजभिये, श्रीमती रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, यांची भाषणे झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. महंत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment