Friday, 3 April 2020

तक्रार निवारणासाठी ‘लॉकडाऊन मॅनेजमेंट पोर्टल’

·         पालकमंत्री नितीन राऊत  यांच्या हस्ते उद्घाटन
·        एकाच ठिकाणी होणार तक्रारींचा निपटारा
         नागपूर, दि. 3: लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांना उद्भवणाऱ्या तक्रारी व विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘लॉकडाऊन मॅनेजमेंट सिस्टम’ हे तक्रार निवारण पोर्टल तयार करण्यात आले असून त्याचे आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार दुष्यंत चतुर्वेदी, राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, निवाशी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            कोरोनाविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आला आहे. या कक्षात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या व तक्रारींचा ओघ वाढला असून यात प्रामुख्याने  दैनंदिन गरजा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, जेष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच दळणवळणाच्या  तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारी विविध विभागाशी संबंधित असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या पुढाकारातून ऑनलाईन तक्रारी निपटारा करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे नियंत्रण कक्षात विभागनिहाय वर्गीकरण करुन पोर्टलच्या माध्यमातून  त्या संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जाणार आहे. या बाबतचा एक एसएमएस त्या विभागाच्या अधिकाऱ्यास पोर्टलच्या माध्यमातून पाठविला जाणार आहे. तक्रार अर्जाची लिंकसुध्दा मोबाईलवर शेअर केली जाणार आहे. यामुळे तक्रारीचा निपटारा करण्यास संबंधित अधिकाऱ्यास सोईचे होईल. तक्रारीची स्थिती व तिचा निपटाराबाबतचा अहवाल पोर्टलवर तयार होणार असल्याने तक्रारीचा गोषवारा जिल्हाधिकारी यांना उपलब्ध होणार आहे.
            या पोर्टलवरील तक्रारीची लिंक संबंधित अधिकाऱ्यास सोशल मिडियाद्वारे लवकरच देण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा एकाच प्लॅटफॉर्मवर होणार असल्याने नागरिकांना ही सेवा अतिशय उपयुक्त ठरेल असे मत डॉ.  राऊत यांनी व्यक्त केले.  तसेच जिल्हा प्रशासनने तयार केलेल्या या पोर्टलसाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे अभिनंदन त्यांनी केले.
***** 

No comments:

Post a Comment