Tuesday, 9 June 2020

लॉकडाऊनमधील 400 प्रशिक्षणार्थींना बार्टीची विद्यावेतनाद्वारे मदत



नागपूर, दि. 9 : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 400 प्रशिक्षणार्थींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), प्रादेशिक कार्यालय, नागपूरच्या वतीने दोन महिन्यांचे विद्यावेतन  देण्यात आले आहे.
           बार्टीमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेकरिता  अनुसूचित जातीतील 400 विद्यार्थ्यांकरिता 10 महिने कालावधीचे नि:शुल्क पूर्वपरीक्षा प्रशिक्षण नागपूर तसेच औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. परंतू शहरात येवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कालावधीत कोरोनाची झळ पोहोचली. परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी नागपूर व औरंगाबाद शहरात अडकून पडले. बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी  प्रशिक्षण बंद असतांना देखील विद्यार्थ्यांचा जेवणाचा व घरभाडयाचा प्रश्न सोडविण्यासाठी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करून दिलासा दिला.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सामान्य नागरिेक, गरीब, मजूर, विद्यार्थी  यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.त्याचाच हा भाग असल्याचे श्री. कणसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी यासाठी बार्टीचे आभार मानले आहे.
                                                ******



No comments:

Post a Comment