Saturday, 4 July 2020

कृषीमंत्री दादाजी भुसे हे उमरेड, भिवापूर तालुक्यातील ‘शेतक-यांच्या बांधावर’














        नागपूरदि. 4: कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषीमंत्री दादाजी भुसे हे दोन दिवसीय विदर्भ दौ-यावर असूनत्यांनी आज उमरेड व भिवापूर तालुक्यातील विविध शेतक-यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष भेटी घेतल्या. उमरेड तालुक्यातील अरविंद गिरडकर, उदासा येथील शेषराव गेडामतर भिवापूर येथील प्रवीण वंजारी यांचा त्यात समावेश आहे.

            उमरेडचे आमदार राजू पारवेविभागीय  कृषी सह संचालक रवींद्र भोसलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडेउपविभागीय कृषी अधिकारी  पी. एन डाखडे, उमरेडचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, भिवापूरचे राजेश जारोंडे उपस्थित होते. 

            राज्यात कृषी संजीवनी सप्ताह व शिवार फेरीनिमित्त कृषि मंत्री दादाजी भुसे दोन दिवसापासून नागपूर जिल्ह्यातील विविध गावातील शेतक-यांना बांधावर जावून प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
            आज सकाळी उदासा येथील प्रवीण वंजारी या युवा शेतक-याने पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे. त्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2019-20 अंतर्गंत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या सहाय्याने शेडनेट उभारले असून, त्यातून विविध भाजीपालावर्गीय पिके, फळांची रोपे तयार करून शेतक-यांना विक्री करत आहेत. त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन होत असल्याचे प्रवीण वंजारी यांनी सांगितले. उमरेडलगत अरविंद गिरडकर यांच्या शेतात प-हेरोवणी सुरु असताना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली. त्यावेळी उपस्थित महिला शेतमजुरांसोबत धानलावणी, त्यांची मजुरी, कामाच्या वेळाबाबत चर्चा केली.
            भिवापूर येथील नसीर मलिक यांच्या मिरची सफाई छाटणी केंद्राला कृषीमंत्री श्री. भुसे यांनी भेट दिली. येथील भिवापुरी मिरचीच्या भौगोलिक मानांकनासोबत तिचा दर्जा, उत्पादकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मिरची बियाण्यात संशोधन करावे. या वाणाच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादकतेत वाढ करुन हे वाण जपण्याचे शेतक-यांना आवाहन केले. भिवापुरी मिरचीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यात डॉ. नारायण लांबट यांनी प्रयत्न केल्याबद्दल कृषीमंत्र्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
            तसेच मिरची छाटणी केंद्र मालकाने येथे काम करणा-या कामगारांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात, मिरची छाटणी हे काम अत्यंत मेहनती आणि कष्टप्रद आहे. तसेच नागपूर जिल्ह्याचे उन्हाळ्यातील तापमान बघता मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना प्रति किलो मिरची काटणीचा भाव वाढवून देण्याच्या सूचनाही श्री. भुसे यांनी केल्या. भिवापूर येथील युवा शेतकरी प्रवीण वंजारी याने पारंपरिक शेतीला फाटा देत कारले व चवळी ही भाजीपाला पिके घेतली असून, भाडेतत्त्वावरील शेतीतून त्याला साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना सांगितले. 
            स्वत:प्रमाणे या भागातील अनेक शेतक-यांना आधुनिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच शेतात पिकवलेला भाजीपाला व्यापा-यांना न विकता, थेट ग्राहकांपर्यंत विकण्यासाठी साखळी तयार करुन त्यातून रोजगारनिर्मिती करावी. त्यासाठी पुणे येथे प्रशिक्षण केंद्र असून, आठवड्याभराचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना दिल्या.
            आधुनिक पद्धतीने शेती करुन पंचक्रोशीत आदर्श निर्माण करत इतर शेतक-यांना प्रेरणा दिल्याबद्दल कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रवीण वंजारीचे शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. कृषी मंत्री श्री. भुसे यांनी  शेताच्या बांधावर वृक्षारोपण केले.
***** 

No comments:

Post a Comment