Saturday, 4 July 2020

शेतक-यांनी गटशेतीला प्राधान्य द्यावे - कृषीमंत्री




       
        नागपूर, दि. 4: शेतकऱ्यांनी शेतीतील उत्पादन खर्च कमी आणि नफा जास्त मिळविण्यावर भर द्यावा.  तसेच पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पद्धतीने गटशेतीला प्राधान्य देण्याचे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतक-यांना केले.
             कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषी मंत्री पूर्व विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज उमरेड व भिवापूर येथील आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
            उमरेडचे आमदार राजू पारवे, विभागीय कृषी सह संचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी  पी. एन डाखडे, उमरेडचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, भिवापूरचे राजेश जारोंडे उपस्थित होते. 
            राज्य शासनाच्या फलोत्पादन विकास प्रकल्पांतर्गंत विविध फळपिकांची लागवड करुन त्यासोबतच इतर ही आंतरपिके घेता येतील. नागपूरची मोठी बाजारपेठ असताना भाजीपाला व इतर पिके घेताना शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य देण्याकडे लक्ष वेधले. तसेच विविध कृषी आधारित उद्योग सुरु करुन, टाळेबंदीच्या काळात बंद पडलेल्या उद्योगांना सुरु करताना रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. राज्य शासनाकडून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेतून कृषी मालाच्या पणनविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या स्मार्ट योजनेचा सर्वांनी लाभ घेत आर्थिक स्तर उंचावण्याचे आवाहन शेतक-यांना केले.        
            घरात कापूस पडून असून, तो खरेदी करण्यासाठी जिनिंग मालकांना आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिककर्ज तात्काळ मिळावे, सोयाबिनचे उगवणक्षमता कमी असलेले बियाणे विक्री केलेल्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही शेतक-यांकडून तक्रारी आल्यास संबंधित बियाणे कंपन्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
                                                                        ********  

No comments:

Post a Comment