नागपूर, दि. 3: विविध सामाजिक उपक्रमात अग्रणी राहणाऱ्या महावितरणने
नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला 20 व्हेंटिलेटर प्रदान करून कोविड विरोधातील लढाईत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख
उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व्हेंटिलेटर प्रदान केल्याचे प्रमाणपत्र
शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले. क्रीडामंत्री सुनील केदार, महावितरणच्या
नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी यावेळी
प्रामुख्याने उपस्थित होते.
महावितरणकडून
विविध उपक्रमाद्वारे नेहमीच सामाजिक
बांधिलकी जोपासण्यात येते. 2019 मध्ये 11 ऑक्टोबरला
महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयात सुमारे 6 हजार कर्मचाऱ्यांनी
एकाच वेळी रक्तदान केले होते. कोरोनाशी लढतांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून
वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक मदत केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या
लढाईत योगदान देताना महावितरणच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या समारंभात शासकीय रुग्णालयाला 20 व्हेंटिलेटर प्रदान
करण्यात आल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विशेष पुढाकार घेतला. महसूलमंत्री बाळासाहेब
थोरात यांच्या हस्ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल
मित्रा यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महावितरणकडून हे 20
व्हेंटिलेटर यापूर्वीच प्रदान करण्यात आले असून ते कार्यान्वितही झाले आहेत.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर
मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार
उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी
अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला व नागपूर
परिमंडळाचे मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके इत्यादी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment