‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त बौद्ध अनुयायांकडून सुरक्षेचे नियम पाळत अभिवादन
• मोजक्या उपस्थितीतही पाळले गेले कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्देश
नागपूर, दि. 26 : कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दसरा-विजयादशमीला बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाच्यावतीने बौद्ध अनुयायांना केले होते. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या वर्षी घरीच साजरा करावा] असे आवाहन केले होते.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, स्थानिक प्रशासन आणि स्मारक समितीने केलेल्या आवाहनाला अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर बौद्ध अनुयायी अत्यंत मोजक्या उपस्थितीत साधेपणाने मात्र सुरक्षिततेचे नियम पाळत व मास्क लावून पवित्र दीक्षाभूमीवर येत अभिवादन केले.
दरवर्षी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भव्य सोहळ्याचे आयोजन करत असते. या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून बौद्ध अनुयायी उपस्थित राहतात. मात्र, यावर्षी जागतिक महामारीने संपूर्ण जग थांबले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची संपूर्ण खबरदारी घेतली. परिणामी दिवसभर दीक्षाभूमी येथे अनेक अनुयायांनी येऊन अत्यंत साधेपणाने अभिवादन केले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनुयायांनी प्रवेशद्वारावरुन अभिवादन केले.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्तजी, राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख मार्शल प्रकाश दार्शनिक, केंद्रीय समिती सदस्य मार्शल किशोर चहांदे, महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अविनाश दिग्विजय, तेलंगाणा राज्य संघटक मार्शल रविचंद्र जाभाडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी समता सैनिक दलाने रितेश गायमुखे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करत मानवंदना दिली. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉयलेट्स, रुग्णवाहिका, अग्नीशामक दलाचे पथके तैनात करण्यात आली.
स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्याकडून जनतेचे आभार
यावर्षी कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व जनतेला आणि बौद्ध अनुयायांना आवाहन केले होते. यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपापल्या घरुनच साजरा करावा, जेणेकरुन कोविड-19 चा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होणार नाही. जनतेनेही स्मारक समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत अभिवादन केले. त्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी आभार मानले.
*****
No comments:
Post a Comment