Wednesday, 11 November 2020

 मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध  -  रवींद्र ठाकरे 



नागपूर, दि.11: विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणूक अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी पालन करावे, पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. 

  छत्रपती सभागृह येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.   

 नागपूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करताना कोविड 19 महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वांनी काळजी घेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. 

 विधान परिषद पदवीधर निवडणुकीसाठी पात्र मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच अंधत्व असलेल्या किंवा सोबतीची आवश्यकता असल्यास दिव्यांग मतदाराने तीन दिवस आधी सहायकाच्या संपूर्ण नावासह तशी लेखी सूचना निवडणूक विभागाला देण्याच्या सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ठाकरे यांनी दिल्या. 

तसेच 80 वर्षापुढील पदवीधर मतदारांना पोस्टल बॅलेट मतदान करता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान करताना सर्व मतदारांनी मराठी, इंग्रजी किंवा रोमन आकड्यातच पसंती क्रमांक लिहावा. (अक्षरांत लिहू नये)  तसेच तो लिहताना एकापेक्षा जास्त भाषेत लिहू नये, अशा सूचनाही यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या. 

 भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारास त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती तीन वेळा वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात प्रसारित करावी लागेल. तसेच मतदान करताना शाई डाव्या चार बोटांपैकी एका बोटाला लावली जाईल, मतदान केंद्राचे व्हिडिओग्राफी, वेब कास्टिंग करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

     उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर, तहसीलदार निवडणूक राहुल सारंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, भाजपाचे रमेश दलाल, काँगेसचे अभय रणदिवे, सीपीआयचे अरुण वनकर, व अन्य पक्षांचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते. व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 ***

No comments:

Post a Comment