Thursday, 4 February 2021
जागतिक कर्करोग महिना संकल्पना शिबिराचे आजपासून आयोजन
दर शुक्रवार व शनिवारी होणार पूर्व तपासणी
नागपूर, दि. 4 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातर्फे राज्य शासानाच्या विविध शासकीय विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची कर्करोग पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. या विशेष शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उद्या शुक्रवार, दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
पहिल्या टप्प्यात पोलीस विभागातील कार्यरत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर इतर विभागातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. या शिबिरात विविध वैद्यकीय चाचण्यांची तपासणी करण्यात येईल. शासकीय विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. के. आर. सोनपुरे यांनी केले आहे.
या विशेष शिबिरात स्त्रीरोग व प्रसुतीरोग तज्ञ डॉ. अनु भुते तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये अभियान संचालक, नॅशनल हेल्थ मिशन, नागपूर येथील समन्वयक श्रीमती गितांजली बुटी, श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. कुंतल सोनपुरे, आरुण्या फाऊंडेशन, नागपूर, आकार स्कूल ऑफ नर्सिंग, हिंगणा, श्री. गोविंदा मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सोसायटी यांचे सहकार्य लाभणार असल्याचे डॉ. सोनपुरे यांनी सांगितले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment