Monday, 8 March 2021

समाजात स्त्री-पुरुष समानतेवर काम करण्यासाठी मोठा वाव - विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार • राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन नागपूर दि. 8 : स्त्रिया समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांचे समाजाच्या विकास प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीचे स्थान राहिले आहे. आपण स्त्री-पुरुष समानतेवर बोलत असलो तरी अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, बालकल्याण समितीच्या सदस्या अँड. सुरेखा बोरकुटे आणि अनघा मोघे उपस्थित होत्या. राज्यात आजपासून राज्य महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरु करण्यात आली असून, सर्व जिल्ह्यातील पीडित महिलांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने ऐकून घेतल्या जाणार असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. त्यामुळे पीडितांनी न घाबरता आपल्या अडचणी, तक्रारी तसेच गा-हाणी आयोगाकडे मांडण्याचे त्यांनी आवाहन केले. भारतीय समाजात स्त्रियांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. तरीही त्यांच्यावरील अन्याय –अत्याचार थांबलेले नाहीत. हे अत्याचार थांबविणे किंवा ते नियंत्रणात आणण्याचे काम सर्वांनी मिळून करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजात वावरताना स्त्रियांना बिकट प्रसंगांना सामोरे जावे लागते. स्त्री-पुरुष समानतेची दरी मोठी राहिली असून, विद्यमान काळात ती काही प्रमाणात भरुन निघत असली तरीही त्यावर समाजाला मोठे काम करावे लागणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टीने महिलांचे समुपदेशन केले जाईल. तक्रारींचे निवारण करताना गरज भासल्यास स्थानिक पोलिस ठाण्याकडून सहकार्य घेतले जाणार असून, अति महत्त्वाच्या व गंभीर स्वरुपाच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला सहभाग वाढविण्याची नितांत गरज असून, त्यावर समाजाने सहकार्याची भावना ठेवून काम केले पाहिजे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. आयोगाच्या विभागीय कार्यालयाकडून सुनावणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, या कार्यालयाचे विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तरी नागपूर‍ विभागातील अत्याचार पीडित महिलांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय सुरु झाल्यामुळे पीडितांना दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कोल्हे यांनी केले. तर अनघा मोघे यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी किंवा तक्रार करण्यासाठी पीडितांनी शासकीय करुणा महिला वसतिगृह, पाटणकर चौक, नारी रोड, नागपूर‍ येथे किंवा ddy.commissionernagpur@rediffmail.com किंवा 0712-2640050 येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment