Monday, 8 March 2021
स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यासाठी
महिलांनी निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळवावा
- हेमराज बागुल
• विभागीय माहिती केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात
नागपूर दि.8 : समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी विविध आघाड्यांवर जाणिवेने प्रयत्न होणे गरजेचे आहेत. सर्व क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा लक्षणीय सहभाग वाढल्यास स्त्रियांना न्याय मिळण्यासोबतच सामाजिक समतोल राखण्यास निश्चितच मदत होईल. त्यादृष्टीने स्त्रियांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले.
सीताबर्डी परिसरातील विभागीय माहिती केंद्रात आज जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बागुल बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी. असे सांगून श्री. बागुल म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रातील स्त्रिया आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. विविध समाज सुधारकांच्या कृतीशील कार्याचा हा आज दिसणारा परिणाम आहे. मात्र तरीही लिंगसमानतेचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झालेले नाही. काही क्षेत्रात स्त्रिया अद्यापही माघारलेल्या आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा निर्णायक सहभाग नाही. तो निर्माण झाल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीत. स्त्रियांना समजून घेण्यासाठी समाजाने जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. कारण संवेदनशील समाजमनामुळे स्त्रियांवरील अत्याचार, अन्याय निश्चित थांबतील. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत स्त्रियांवरील घरगुती अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंगणघाट येथील प्राध्यापक महिलेचे जळीत प्रकरण असो वा नुकत्याच घडलेल्या अहमदाबाद येथील आयेशा बानो या महिलेचा पुरुषी मनोवृत्तीने घेतलेला बळी असो, हे चित्र बदलण्यासाठी समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असेही श्री. बागुल यावेळी म्हणाले.
आजच्या तरुण पिढीने समाजमाध्यमांच्या आभासी विश्वात न रमता आपल्या अडीअडचणींबाबत कुटुंबियांशी संवाद साधावा. कुटुंबीयच आपले खरे मित्र असतात. महिला बरेचदा भितीपोटी बोलत नाहीत. यामुळेच अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढते. यासाठी महिलांनी बोलते होणे गरजेचे असल्याचे मत श्री. टाके यांनी यावेळी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा प्रत्येक महिलेसाठी अभिमानाचा दिवस आहे. हा केवळ एकच दिवस साजरा न करता वर्षभर स्त्रियांच्या प्रश्नांची दखल घेणे गरजेचे आहे. बालपणापासून मुलीप्रमाणे मुलांनाही घरातून शिष्टाचार, संस्काराचे धडे देणे गरजेचे आहे. यामुळे स्त्री-पुरुष समानता घरापासूनच शिकविली जाईल, अशी अपेक्षा श्री. गडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
माहिती विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा तसेच विभागीय माहिती केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी तर आभार श्रीमती कविता फाले यांनी मानले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment