Monday, 8 March 2021
महिलांनो पुढे या, मतदार यांदीत नाव नोंदवा
- अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे
• जागतिक महिला दिन उत्साहात
नागपूर, दि.8: आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परंतु सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यासाठी महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक असल्यामुळे महिलांनी पुढे येवून आपले नाव मतदारयादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी हेमा बढे, विजया बनकर, सुजाता गंधे, ज्येष्ठ पत्रकार गिता तिवारी, निवडणूक प्रक्रियेच्या नागपुरातील ॲम्बेसिडर ज्योती आमगे, तहसीलदार राहूल सारंग तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
महिला दिन हा प्रत्येक महिलांचा अभिमान व आनंदाचा दिवस असतो. या निमित्ताने मतदार यादीत नाव नोंदवून निवडणूक प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे श्री. पांडे म्हणाले. मतदानाच्या टक्केवारीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी आहे. महिलांनी यात सहभाग घेऊन हे प्रमाण वाढविले पाहिजे. जिल्ह्यात मतदानाच्या कामात चार निवडणूक निर्णय अधिकारी महिला आहेत. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच मतदार याद्या अद्यावतीकरणात महिला केंद्र प्रमुखांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या ॲम्बेसिडर सुध्दा महिला आहेत. त्यामुळे महिला मतदारांची टक्केवारी वाढून पन्नास टक्क्यांवर गेली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील महिलांनी सुध्दा या कामात मोलाचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यपध्दती व सहभाग निश्चित राहिल्यास महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढेल. त्यासाठी अपेक्षित सहकार्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात तहसीलदार श्री. सारंग यांनी जागतिक महिला दिनाबाबत माहिती देताना सांगितले की, महिलांचे अधिकार व जागरुकतेसाठी महिला दिन साजरा करण्यात येतो. महिला मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. नवीन मतदारांनी डिजीटायझेशनच्या युगात ई-पिक प्रणालीचा वापर करुन आपली नोंदणी करुन घ्यावी, असे ते म्हणाले. महिला मतदार नोंदणीतील वाढीसाठी माध्यमांचे तेवढेच महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘निवडणूक प्रक्रिया व महिलांचे हक्क’ या विषयावर बोलताना मृदूला मोरे यांनी सांगितले की, राज्य घटनेने देशात महिलांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, परंतु मतदानाच्या टक्केवारीत त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य महिलांनी चोखपणे बजावले पाहिजे, तरच महिला मतदारांची टक्केवारी वाढेल. त्यासोबतच राजकीय क्षेत्रात आपला सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नीता तिवारी, डॉ. नीलम सांगोळे यांनी ‘स्त्रीशक्ती देशाची, ताकत लोकशाहीची’ या विषयावर समयोचीत मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला मतदान केंद्र प्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment