Saturday, 2 October 2021
विधि विद्यापीठ बांधकामाच्या निधीसाठी अर्थमंत्र्यांकडे लवकरच बैठक - उदय सामंत
· पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आवश्यक निधी तत्काळ मिळवून देणार
· उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा
· यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची मुंबईत बैठक
नागपूर, दि. 2 : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या इमारत बांधकामातील पहिल्या टप्प्यात असलेले बांधकाम निधीअभावी अपूर्ण राहिले आहे. यामध्ये 13 इमारतींचा समावेश आहे. ते बांधकाम लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष वर्ग सुरु व्हावेत. त्यासाठी 95 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच विद्यापीठ प्रशासनाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ येथे आयोजित आढावा बैठकीत श्री. सामंत बोलत होते.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, कुलसचिव आशिष दीक्षित, सहायक कुलसचिव रंगास्वामी स्टँलीन, विशेष कार्य अधिकारी रमेश कुमार, राजशिष्टाचार अधिकारी रमेश मानापुरे, प्रो. हिमांशु पांडे, प्रो. सोपान शिंदे, वास्तुशास्त्रज्ञ सल्लागार पी. एस. आहुजा उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील बांधकाम निधीअभावी थांबले असून, ते लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. विधि विद्यापीठ परिसराबाबत समाधान व्यक्त करून विद्यापीठाचे बांधकाम लवकर पूर्ण झाल्यास त्याचा मोठा लाभ महाराष्ट्राच्या विधि क्षेत्राला मिळणार असल्याचे ते म्हणाले.
या अपूर्ण इमारत बांधकामामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांचे दोन वसतीगृह, भोजन कक्ष, कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. ते पूर्ण करण्यासाठी निधी गरज आहे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर हा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित न ठेवता तो विनाविलंब उपलब्ध करून देण्याचे आदेश श्री. सामंत यांनी सबंधितांना दिले.
श्री. सामंत यांनी विधि विद्यापीठ परिसरातील नूतन इमारत बांधकामाच्या प्रगतीबाबत पाहणी केली. तसेच विकासकामांबाबत लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार यांनी विधि विद्यापीठ इमारतींचे झालेले बांधकाम आणि अपूर्ण राहिलेल्या इमारतींना लागणारा निधी लवकरात लवकर मिळण्याची मागणी श्री. सामंत यांच्याकडे केली.
* * * * *
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment