Monday, 14 February 2022
नांदगाव, वारेगाव येथील तलावामध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करणार - आदित्य ठाकरे
·नांदगाव तलावाची पाहणी, ग्रामस्थांशी चर्चा
·शाश्वत विकासासह पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न
नागपूर, दि. 14 : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधील राख नांदगाव व वारेगाव तलावात टाकण्यात येत असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नांदगाव येथील ग्रामस्थांशी चर्चा व ॲश पाँडची पाहणी यावेळी त्यांनी केली.
खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, महाजेनकोचे संचालक चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक प्रकाश खंडारे, एस. एम. मारुठकर, एन. एस. वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक व्ही. एम. मोरघरे, प्रादेशिक अधिकारी अशोक करे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यावेळी उपस्थित होते.
नांदगाव तलावात राख टाकल्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून आल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचा आढावा घेतला. यामध्ये राखेमुळे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तलावात राख टाकणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, येथील प्रत्यक्ष परिस्थिती व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे श्री. ठाकरे यांनी नांदगाव येथील ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.प्रदूषण रोखण्यासाठी नांदगाव तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल. ही राख वाहून आणणारी पाईपलाईन काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सध्या टाकण्यात आलेली राखही तातडीने उचलण्यात येईल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार शंभर टक्के फ्लाय अॅशचा वापर रस्ते बांधकामासह इतर पायाभूत प्रकल्पांसाठी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि महाजेनकोची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. विकास कामांसोबतच पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे श्री. ठाकरे यांनी फ्लाय ॲश पाँडच्या पाहणीप्रसंगी सांगितले.
नांदगावमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच या परिसरातील कोळसा वाहतूक बंदिस्त वाहनातूनच होईल, याची दक्षता घ्यावी. नांदगाव तलावासाठी जमिनी अधिग्रहित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्यासाठी आराखडा तयार करावा. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
औष्णिक विद्युत प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करून हे प्रदूषण कमी करण्यासाठी व्यापक अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी राज्यातील सर्व वीज प्रकल्पांचे प्रदुषणासंदर्भात ऑडीट करण्यात येईल. तसेच निर्धारित मानकांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले जाईल. असे श्री. ठाकरे यांनी सांगितेल.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment