Wednesday, 9 February 2022
सामान्य नागरिक हाच महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू - श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा
नागपूर, दि. 9 : महसूल प्रशासन संगणकीकृत होत असून त्या अंतर्गत येणाऱ्या सेवा नागरिकांना जलद व घरबसल्या मिळाव्यात, यासाठी आवश्यक बदल होत आहेत. सामान्य नागरिक हा महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू असून त्यांना जलद गतीने सेवा मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज सांगितले.
हिंगणा येथे आयोजित फेरफार अदालतीमध्ये श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे व तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फेरफार अदालत घेण्यात आली.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित करण्यात येत आहे.
नागरिकांना त्यांचे जमिनीचे फेरफार व इतर अनुषंगिक नोंदी अद्ययावत करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आवाहन केले. तसेच मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर फेरफार विहित कालावधीत निकाली काढण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या.
सामान्य नागरिकांचे विहित कालावधी पूर्ण झालेले फेरफार यावेळी मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करण्यात आले व अर्जदारास फेरफारची नोंद झालेल्या अद्ययावत सातबाराचे वाटप करण्यात आले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment